डांबरी रस्त्यांना मुरुमाचा लेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:04 PM2017-09-26T22:04:26+5:302017-09-26T22:04:40+5:30
तुमसर शहरात श्रीराम नगरातील मुख्य मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरात श्रीराम नगरातील मुख्य मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे, मुरुम, गिट्टी टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दिवसभर खड्ड्यातील धुळ वातावरणात मिसळत असून नागरिकांना श्वसनाचा आजार बळावित आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
तुमसर शहरातून तुमसर-भंडारा-कटंगी हा राज्यमार्ग जातो. श्रीराम नगरातील प्रमुख रस्ता खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यात गिट्टी, मुरुम टाकून बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खड्ड्यातील मुरुमाची धुळ वातावरणात मिसळत आहे. गड वाहतुकीने संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य दिसते. वृद्ध, लहान मुलांना यामुळे श्वसनाचा आजारासोबतच डोळ्यांचा आजार बळावले आहेत. अनेक जणांनी याबाबत तक्रार केली.
डांबरी रस्त्यावरील खड्डे चुरी आणि डांबराचा वापर करून बुजविले जातात. मात्र या विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मुरुम व गिट्टीचा वापर केला. सर्वच खड्डे गिट्टी व मुरुम टाकून बुजविले गेल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारावर कुणीच आक्षेप घेतले नाही हे विशेष. श्रीमंत नगरी म्हणून ओळख असलेल्या शहरात राजकीय नेत्यांची संख्याही मोठी आहे. ऐरवी आंदोलनाचा इशारा देणाºयांनी किमान याबाबत आंदोलन करण्याची गरज आहे. नियम धाब्यावर बसवून खड्ड्यात गिट्टी व मुरुम टाकून मोकळे होण्याचा प्रकार सुरु आहे. चुरी व डांबर घालून खड्डे तयार करण्याच्या नियमाला येथे धाब्यावर बसविण्यात येत आहे. मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याचे देखरेख व नियंत्रण आहे. सुमारे २०० मिटर रस्त्यावर येथे खड्डे पडले आहेत. बसस्थानक परिसरातील रस्त्यावर सुद्धा खड्डे पडले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून संध्याकाळी या रस्त्यावर धुळीचे कण सर्वत्र दिसतात.