अपघातात मायलेक ठार; पितापुत्र गंभीर जखमी
By admin | Published: May 27, 2015 12:38 AM2015-05-27T00:38:59+5:302015-05-27T00:38:59+5:30
नागपूरहून गोंदियाकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्यात उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.
मुंडीपार येथील घटना
पितापुत्रांवर प्रकृती धोक्याबाहेर
लाखनी : नागपूरहून गोंदियाकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्यात उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार शिवारात घडली. जखमींवर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माया धर्मरक्षित टेंभुर्णे (४५) आणि संदेश धर्मरक्षित टेंभुर्णे (२०) अशी मृतकांची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक धर्मरक्षित टेंभुर्णे हे कुटुंबीयांसह कार एमएच ३१ / डीसी २४१ ने नागपूरला गेले होते. सोमवारी रात्री आमगावला परत जात असताना मुंडीपार शिवारात ११.३० च्या सुमारास रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकावर आदळून घासत गेली. यात कारमधील माया टेंभुर्णे यांचा जागीच मृत्यू झाला. संदेश टेंभुर्णे (२०), धर्मरक्षित टेंभुर्णे (४९) आणि पंकज टेंभुर्णे (१४) हे गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान, संदेशचा वाटेतच मृत्यू झाला. जखमी पितापुत्रांवर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
लवारीत अंत्यसंस्कार
या अपघातात मृत्यू झालेले माया टेंभुर्णे आणि संदेश टेंभुर्णे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर साकोली तालुक्यातील लवारी या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाल्यामुळे काही नातेवाईक रुग्णालयात तर काही अंत्यसंस्कारासाठी गेले होते.