‘नॅक’च्या विकेंद्रीकरण धोरणामुळे प्राध्यापकांच्या समाज व विद्यार्थ्यांप्रती उत्तरदायित्वात वृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:19+5:302021-09-21T04:39:19+5:30
विकास ढोमणे : ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची आभासी कार्यशाळा भंडारा : ‘नॅक’ने महाविद्यालयांचे मूल्यांकन करताना महाविद्यालयातील प्रत्येक स्त्रोत आणि संबंधित ...
विकास ढोमणे : ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची आभासी कार्यशाळा
भंडारा : ‘नॅक’ने महाविद्यालयांचे मूल्यांकन करताना महाविद्यालयातील प्रत्येक स्त्रोत आणि संबंधित प्रत्येक भागधारकाला उत्तरदायित्व दिलेले आहे. त्यामुळे नॅकमध्ये चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला त्यांच्या समाज आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या उत्तरदायित्वांचे आकलन करीतच आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे, असे प्रांजळ मत जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी नॅकच्या बदलत्या धोरणाचा आढावा घेताना व्यक्त केले.
सोमवारी (२० सप्टेंबर) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित स्थानीय जे.एम. पटेल महाविद्यालय आणि नागपूर येथील संताजी महाविद्यालय, यशोदा महाविद्यालय, डॉ. एम.के. उमाठे महाविद्यालय, धरमपेठ एम.पी. देव विज्ञान महाविद्यालय, महिला महाविद्यालय आणि खापरखेडा येथील बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय यांनी नॅकने आपल्या मूल्यांकन धोरणात केलेल्या वर्तमान धोरणाच्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या आभासी कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी डॉ. ढोमणे बोलत होते.
प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी यांनी या कार्यशाळेची प्रस्तावना विषद करताना, वर्तमान काळातील प्राध्यापकांना माहिती-संप्रेषण तंत्रज्ञानाला आत्मसात करून त्यात प्रावीण्य प्राप्त करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, आपण स्वतःला अद्यावत केले नाही तर स्वतःच्याच अधोगतीला प्राप्त होऊ. जे सक्षम असतील, तेच या समकालीन शिक्षण व्यवस्थेत टिकाव धरतील. संगमनेर नगरपालिका महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी अंतर्गत गुणवत्ता अहवालातील प्रथम प्रवर्गावर व्याख्यान देताना अभ्यासक्रमाचे अध्यापन, आरेखन आणि त्यातून बाहेर पडणारे उत्पादन यांचे सविस्तर विवेचन केले. सहभागी प्राध्यापकांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देताना “चलता है” असा दृष्टिकोन न बाळगता अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करूनच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या आभासी कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ. उमेश बन्सोड यांनी, तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. अपर्णा यादव यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनात या महाविद्यालयांच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षांचे समन्वयक डॉ. कार्तिक पणिक्कर, डॉ. श्रीकांत पाजणकर, डॉ. कृष्णा मेश्राम, डॉ. समीर नईम, डॉ. रत्नाकर लांजेवार, डॉ. अनिल डोडेवार आणि डॉ. संगीता चोरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यशाळेत प्राचार्य धनराज शेटे, प्राचार्य ज्ञानेश्वर नाईक, प्राचार्य अखिलेश पेशवे, प्राचार्य वंदना भागडीकर व प्राचार्य रामकृष्ण टाले आभासी स्वरूपात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. एस. आर. शर्मा, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. श्याम डफरे, डॉ. रोमी बिश्त, डॉ. आनंद मुळे, डॉ. पद्मावती राव, डॉ. विणा महाजन यांनी सहकार्य केले.