नगरपंचायत निवडणूक : २२ हजार ८९६ मतदारांच्या हाती १६८ उमेदवारांचे भाग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:18 PM2021-12-19T17:18:46+5:302021-12-19T17:34:24+5:30
जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, २२ हजार ८९६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६८ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे.
भंडारा : जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, २२ हजार ८९६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६८ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे. २१ डिसेंबर राेजी ४१ मतदान केंद्रावर निवडणूक हाेणार आहे.
जिल्ह्यातील लाखनी, माेहाडी आणि लाखांदूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची घाेषणा करण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षणावरून तिन्ही नगर पंचायतीतील प्रत्येकी चार जागांची निवडणूक रद्द झाली. त्यामुळे आता प्रत्येक नगरपंचायतीत १३ जागांवर अशा एकूण ३९ जागांची निवडणूक हाेत आहे. यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली.
लाखनी नगरपंचायतीच्या जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ मतदान केंद्रावर मतदान हाेणार आहे. ९ हजार ८६१ मतदार असून, त्यात चार हजार ८२६ पुरुष, तर पाच हजार ३५ महिला मतदार आहे. याठिकाणी अटीतटीची लढत हाेत असून अपक्षांनी येथे पक्षीय उमेदवाराची डाेकेदुखी वाढविली आहे.
माेहाडी येथील तेरा जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात आहे. येथे १३ मतदान केंद्रावर निवडणूक हाेणार आहे. सात हजार १२८ मतदार असून, त्यात ३४९४ पुरुष, तर ३६३४ महिला मतदार आहेत. माेहाडीतही निवडणुकीने चांगलीच रंगत आणली आहे. लाखांदूर नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीत २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे ५९०७ मतदार असून, त्यात २९६६ पुरुष, तर २९४१ महिला मतदारांचा समावेश आहे. तीन नगरपंचायतीच्या २२ हजार ८९६ मतदारांमध्ये ११ हजार २८६ पुरुष, तर ११ हजार ६१० महिला मतदार आहे. नगरपंचायतीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
स्थगित जागाची निवडणूक १८ जानेवारीला
ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींची १२ प्रभागांची निवडणूक आता १८ जानेवारी राेजी हाेत आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम घाेषित करण्यात आला असून, २८ डिसेंबर राेजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी आहे, तर नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख १० जानेवारी आहे. दि. १८ जानेवारीला मतदान हाेणार असून, दि. १९ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार आहे.