जिल्ह्यात ५३ ठिकाणी होणार आज नमाज पठण
By admin | Published: July 7, 2016 12:26 AM2016-07-07T00:26:32+5:302016-07-07T00:26:32+5:30
मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पावन मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट उद्या (गुरूवारी) ‘ईद’ साजरी करून होणार आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त : बाजारपेठेत उलाढाल वाढली
भंडारा : मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पावन मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट उद्या (गुरूवारी) ‘ईद’ साजरी करून होणार आहे. शहरासह जिल्ह्यातील मस्जिद विद्युत रोषणाईने ऱ्हाऊन निघाल्या आहेत. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यात ५३ ठिकाणी विशेष नमाजाचे पठण केले जाणार आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त लावला आहे.
ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी चंद्रदर्शन झाले नाही. परिणामी बुधवारी साजरी होणारी ईद चंद्रदर्शनानंतर गुरूवारी साजरी करण्यात येत असल्याची माहिती आहे. यादरम्यान ईदनिमित्त शहरातील बाजारपेठेला झळाळी आली आहे. विशेषत: सुका मेवा विकणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. याशिवाय रेडीमेड कापड्यांच्या दुकानांमध्ये झुंबड दिसत आहे. आज बुधवार लहान बाजाराचा दिवस असल्याने मुख्य रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात होती.
किसमिस, काजू, खुरमा, खजूर, शेवया, फेनी, पिस्ता, अक्रोड, अंजीर, केसर आदींची जोरदार मागणी आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणी असून सर्वांना सुरक्षेबाबत सतर्क करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक सुरक्षेवर निगराणी ठेवणार आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाची एक कंपनी व ३५० होमगार्डचे जवान सुरक्षा व्यवस्थेत कामगिरी बजावणार आहेत. (प्रतिनिधी)