‘एक नमन गौरा हर बोला हर हर महादेव’ झडत्या गुंजणार

By admin | Published: September 12, 2015 12:38 AM2015-09-12T00:38:57+5:302015-09-12T00:38:57+5:30

शेतकऱ्यांचा महत्वाचा सण समजला जाणारा पोळा हा उद्या १२ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

'A Naman gaura har har har har har mahadev' will be bogged down | ‘एक नमन गौरा हर बोला हर हर महादेव’ झडत्या गुंजणार

‘एक नमन गौरा हर बोला हर हर महादेव’ झडत्या गुंजणार

Next

पोळा विशेष : पावसाची दडी, महागाईचे सावट असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
भंडारा : शेतकऱ्यांचा महत्वाचा सण समजला जाणारा पोळा हा उद्या १२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. मात्र यावेळी पावसाने दडी मारल्याने व महागाईचे सावट असल्याने सण साजरा करण्याविषयी शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून येते.
परसोडीवासीयांनी जपली १५७ वर्षांची परंपरा
जवाहरनगर : परसोडी जवाहरनगर येथे इंग्रज राजवटीपासून म्हणजे सन १८५८ पासून या ठिकाणी दरवर्षी ऐतिहासिक पोळा भरतो. हा पोळा विदर्भात प्रसिद्ध आहे. पिढ्यानपिढ्या हा पोळा येथील सर्वधर्म समभावनेतून जपल्या जात आहे.
परसोडी येथे पुर्वी वंजारी, गुप्ते, हटवार, डोरले, पडोळे, सुखदेवे, मोटघरे, मेश्राम यांची घरे होती. गजानन महाजन यांची वतनदारी सावरी-ठाणा-नांदोरा येथे होती. गुप्ते पाटलांची वतनदारी परसोडी, बाचेवाडी, सिरसुली, किन्ही, एकोडी येथे होती. आजही परसोडी येथे महाजन यांचा व गुप्ते पाटलांचा वाडा अस्तित्वात आहे. या वाड्यासमोर बैलांचा पोळा उत्साहात साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांद सेकले जातात. पोळ्याच्या दिवशी बैलांना रंगरंगोटी करून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गुप्ते पाटलांची १२ जोडी व गजानन महाजन यांची १५ जोडी. मध्यभागी आंब्याच्या तोरणाखाली बैलजोड्या एकत्र करीत असत. पोळ्यानिमित्त पारंपारिक झडत्या म्हटल्या जात असे. दपटू डोरले व मारोतराव हटवार यांचे वडील व प्रथम गावचे सरपंच राहिलेले भिवा हटवार यांनी हा पोळा टिकवून ठेवला होता. आज त्यांचे वारसार नवी पिठीतील मुल नातवंड ऐतिहासीक पोळा जतन केलेला आहे. परसोडी गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. सन १९८० पासून बैलांच्या सजावटीसाठी विशेष बक्षीस देण्याला प्रारंभ झाला. यामुळे ऐतिहासिक पोळ्याला महत्व प्राप्त झाले. या काळामध्ये दिडशे ते दोनशे बैलांच्या जोड्या सहभागी होत असत. आजतागायत हीच परंपरा या गावातील जनतेनी टिकवून ठेवली. हा पोळा पाहण्यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भातील अन्य जिल्हामधून नारिकांची गर्दी येत असते. गावात तीन दिवस जत्रेचे स्वरूप पाहायला मिळतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य कुस्तीची आम दंगल, महिलांसाठी विविध स्पर्धा घेतली जातात. तर सायंकाळी ५ वाजता लहान बालगोपालांसाठी ताना पोळाचे आयोजन करण्यात येते. यावेळी लाकडी बैलांचा विविध रंगरंगोटी सजावटी करून तोरणपताका लावलेल्या ठिकाणी एका रांगेने एकत्र जमतात. पोळा पंच कमेटीतर्फे त्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतो.
खांदाशेकणीनंतर आज आवतन घ्या
आसगाव (चौ.) : शनिवारला १२ रोजी बैलाचा पोळा आहे. पोळा हा बैलाचा सण शेतकऱ्यााठी वरणीच असते. मुद्दाम सांगण्याचे कारण की आता पोळा राहिला नाही. यांत्रिक युगामुळे पशुधन कमी झाले आहे.
पोळ्याच्या आधल्या दिवशी बैलाची खांदशेकणी केली जाते. ओली हळद पळस पानाने वर्षभर केलेल्या त्यांच्या खांदाचा ताण कमी व्हावा म्हणून शेतकरी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाची खांदशेकणी करतात. नंतर शेतकरी प्रत्येक बैलाच्या कानात आज आवतन घ्या, उद्या जेवाले या, असे बैलांना जेवणाचे आमंत्रण देतात, शुक्रवार खांदशेकणी शनिवारला पोळ्याच्या दिवशी सजवून रंगवून त्यांची पूजा करण्यात येईल. आरती ओवाळून त्यांना पूरण पोळी खावू घालण्यात येईल. बैलांना दैवत माणून त्याच्या विषयी आपुलकी करण्याचा हा दिवस.
बैल तसाही अपेक्षेचा धनी कष्ट करून व राबराब राबूनही दु:खा कष्टाचे भोगच त्याच्या वाट्याला देतात. कधी कधी तर एखाद्या माणसाला बैलभारती म्हणून विनोदाने चिडविले जाते. तशाही बैल गाढवाला जितक्या तऱ्हा असतील त्या बैल आणि गाढवाच्या वाट्याला येतात. गाढव आणि बैल यांच्यातील एक समान आहे. फरक एवढाच आहे की, बैलाचा दिवस पोळा तरी साजरा केला जातो. दिड दिवसाचे माहेर बैलाच्या वाट्याला येते. बाकी गाढवाचा नुसता बाजार असतो. दिवसभर शेतात राबून संध्याकाळी चारा खाल्ला की बैल जगला म्हणतात. तेल घाणीत कोलूला जपून घ्यायचे आणि शेतात राबायचे तेही मुकाट्याने गाय गो-माता तर मग बैल गोपिता का नाही, असे म्हणायची आता तरी सोय नाही. कारण बैलाकडून या दिवशी तरी कोणतेही काम करवून घेत नाही. माणूस चालून थकला की संध्याकाळी गरम पाण्याने पाय सेकून घेतो. मात्र बैलाच्या वाट्याला तेवढे नसले तरी त्याच्या वाट्याला मात्र खांदशे फणी व जेवणाचे आमंत्रण तर मिळते.
झडत्यांच्या गजरात पोळा साजरा होणार
दाभा : पोळा हा बळीराजा सोबत शेतात राबणाऱ्या बैलाविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा सण. शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलांचा दिवस म्हणजे पोळा. भूमिपुत्रासाठी वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलांची पिठोरी अमावस्येच्या दिवशी पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा आज मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
'माझ्या पायाला रूतल काटा, तर झालो मी रिकामा, नाही पिकल यंदा, तर जीव माझा टांगनिला'. बैलविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा आज जिल्ह्यात सर्वत्र साजरा होत आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय धन्यासाठी राबराव राबणारे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. 'एक चाळा, बैल पोळा, बैल गेला हो पवनी वाळा, पवनीच्या काटाले पावल हो राबणाऱ्या शेतकऱ्याले भरभरून देईल दे, एक नमन गौरा पारबती हर बोला हर हर महादेव' अशा झडत्यांचे सुरू आज गुंजणार आहेत.
जगाचा पोशिंदा आपल्या बैलासाठी पोळ्याचा सण साजरा करतो. पोळ्याला बैलांची आंघोळ केली जाते. खांदा शेकल्या जातो. रोपटाचे केश व्यवस्थित कापल्या जातात. शिंगे रंगविली जातात. वर्षभर नांगर धरला त्या मातेवर हळदीचे मिश्रण चोळल्या जाते.
आवतन दिल्यावर पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांच्या अंगावर झुल चढविणे, गळ्यात घुंगराच्या कवड्यांच्या माळा, गळ्यातील दोर व वेसन बदलविण्यात येते. बेगड, गेरूने शरीरभर ठप्पे मारले जातात. सजविलेले बैल मारोतीच्या मंदिरापुढे देवदर्शन घेवून पोळ्याच्या तोरणात उभे केले जाते. गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरूवात करतो. काळ्या वावरात धानाची शेती, धानाला लागली रोगांची लागण, रामराव म्हणते बुडाली शेती, विजु पाटील म्हणते लाव मातीले छाती, एकनमन गौरा पारबती हर बोला हर हर महादेव. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'A Naman gaura har har har har har mahadev' will be bogged down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.