देव्हाडी उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:13+5:302021-02-12T04:33:13+5:30
तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्याची मागणी केली आहे. ...
तुमसर : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन पाठविले आहे.
मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया राज्यमार्ग २४९ असून येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गत पाच वर्षांपासून सुरू आहे. सदर उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. सर्वच स्तरावरील जनसामान्यांची त्यांच्याप्रति आदराची भूमिका आहे. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव रेल्वे उड्डाणपुलाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात राज्य शासनास तशी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग नागपूरचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाममंत्री, जिल्हा संपर्क मंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकरसह पदाधिकारी उपस्थित होते.