‘अच्छे दिन’च्या नावावर सामान्यांची ‘लूट’
By admin | Published: May 25, 2015 12:43 AM2015-05-25T00:43:58+5:302015-05-25T00:43:58+5:30
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात आरुढ झालेल्या सरकारला आता एक वर्ष झाले. वर्षभरात ‘भेल’ कारखान्याचे काम...
मोर्चात प्रफुल पटेल गरजले
तासभर रोखून धरला महामार्ग, जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा मोर्चात सहभाग
भंडारा : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात आरुढ झालेल्या सरकारला आता एक वर्ष झाले. वर्षभरात ‘भेल’ कारखान्याचे काम एक पाऊलही पुढे सरकले नाही. उलट अदानीची वीज २.६४ रुपये दराने विकत घेऊन राज्य सरकार नागरिकांकडून तिप्पट दराने पैसा वसूल करीत आहे. मागील वर्षभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून ‘अच्छे दिन’च्या नावावर शेतकऱ्यांना लुटणे सुरू आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चात ते बोलत होते. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात शास्त्री चौकातून मोर्चा निघाला. यावेळी खा.पटेल हे बैलबंडीने मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात धानाला भाव मिळालाच पाहिजे, सातबारा कोरा करा, केंद्र सरकार मुर्दाबाद, प्रफुल्लभाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देत हा मोर्चा ३ वाजता त्रिमूर्ती चौकात धडकला. त्याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे म्हणाले, राज्यातील भाजप सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत आहे. क्रिमीलेयरची अट ६ लाखावरुन ४ लाखावर आणली. ओबीसी शिष्यवृत्ती दिली नाही. त्यामुळे विकासासाठी प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या कार्यकाळाची तुलना करताना मागील वर्षभरात जिल्ह्यातील विकासकामांकडे कसे दुर्लक्ष झाल्याचे सांगत ते म्हणाले, मी आतापर्यंत शांत होतो. कारण त्यांना काम करण्याची संधी द्यायची होती. पण एक वर्ष झाले तरी त्यांनी काहीही केले नाही. भंडारा जिल्ह्यात मंजूर करून आणलेला ‘भेल’चा कारखाना सुरू करू शकले नाही, असे सांगून नागरिकांनो आतातरी जागे व्हा, असे आवाहनही खा.पटेल यांनी केले.
या मोर्चात माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, अर्बन बॅकेंचे अध्यक्ष अॅड.जयंत वैरागडे, माजी आमदार दिलीप बन्सोड, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, अॅड.विनय पशिने, महेंद्र गडकरी, डॉ.श्रीकांत वैरागडे, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नलिनी कोरडे, हेमकृष्ण वाडीभस्मे, यांच्यासह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संचालन धनंजय दलाल यांनी केले.
खा.पटेल यांचे भाषण आटोपल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सभास्थानी बोलाविण्यात आले. सुटीमुळे जिल्हाधिकारी मुख्यालयी नव्हते, त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन व उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी हे मोर्चास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. या निवेदनात विविध २४ मागण्यांचा समावेश होता. यावेळी पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात पोलिसाचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. (प्रतिनिधी)
कुठे छावा अन् कुठे संग्राम?
स्वत:ला भुमिपुत्र व शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे आता कुठे गेले असा प्रश्न करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही ते अश्रु पुसायला येत नाहीत. आम्ही मागीलवर्षी धानाला प्रति क्विंटल २०० रूपये बोनस देऊन शेतकऱ्यांना मदत केली. परंतु, आंदोलने करणारे आता सत्तेत येऊनही काहीच बोलत नाही. आंदोलन करून जनतेची दिशाभूल करणारी ‘छावा’ आणि ‘संग्राम’ गेली कुठे आहे, असा टोमणाही त्यांनी लगावला.
योजना बंद करण्याचा घाट
संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाने शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. मात्र मोदी शासनाने गत वर्षभरात सामान्यांची स्वप्ने धुळीला मिळविली. कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट शासनाने लावला आहे. घरकुल योजनेचे पैसे कमी केले, एपीएल धारकांना धान्य न देणे, बीआरजीएफ सारखी महत्त्वपूर्ण योजना बंद केल्याचा आरोप केला. विजेचे भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वैनगंगा निर्मल कशी होणार?
प्रधानमंत्री आपल्या मतदारसंघातील गंगा नदी निर्मलगंगा करण्यासाठी निधी खर्ची घालत आहेत. परंतु आमच्या जिल्ह्यातील जिवनदायिनी असलेल्या वैनगंगेची मात्र दुरावस्था होत आहे. ज्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यांचीच नागपूर महापालिकेतही सत्ता आहे. त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही.