ग्रामपंचायतच्या मतदार यादीत मयतांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:38+5:302021-01-21T04:31:38+5:30
चुल्हाड (सिहोरा) : गावातील मतदार यादीत मयत झालेल्यांची आणि विवाह करून गेलेल्या मुलींची नावे अधिक असल्याचे गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक ...
चुल्हाड (सिहोरा) : गावातील मतदार यादीत मयत झालेल्यांची आणि विवाह करून गेलेल्या मुलींची नावे अधिक असल्याचे गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आले आहे. यामुळे विवाहिता मुली दोन गावांत मतदानाचा हक्क बजावीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दरम्यान, मृतक आणि विवाहिता मुलींची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिहोरा परिसरातील सुकली नकुल, गोंडीटोला, महालगाव, पिपरी चुनही, रेंगेपार, चुल्हाड अशा सहा गावांत गट ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली. मात्र निवडणुकीची अधिसूचना घोषित झाल्यानंतर उमेदवारांनी गावातील मतदार यादीवर नजर फिरवली असता त्यांना धक्काच बसला होता. या यादीत बहुतांश उमेदवार मृतक असल्याचे दिसून आले. त्यांची नावे जलद गतीने वगळण्यात आली नाहीत. यामुळे मतदार यादीत नावांचा आकडा फुगत आहे. प्रत्येक वॉर्डात ८ ते १० नागरिक मृतक असतानाही गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नावे वगळण्यात आलेली नाहीत. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येत नसल्याने सर्वत्र घोळ असल्याचे दिसून येत आहे. मृतकांची नावे जलद गतीने मतदार यादीतून हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने गावातील लोकसंख्या वाढही दिसून येत आहे.
प्रत्यक्षात तितकी लोकसंख्या गावात नाही. गत ८ ते १० वर्षांपासून सासरी नांदणाऱ्या विवाहित मुलींची नावेही मूळ गावांतून वगळण्यात आलेली नाहीत. या विवाहिता मुलींची नावे सासरच्या गावांतील मतदार यादीतही आहेत. यामुळे एकच विवाहिता दोन गावांत प्रत्यक्षात मतदानाचा हक्क बजावत आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत या विवाहिता मुलींच्या मतदानाला मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अशा मतदानाकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. या विवाहिता मुलींना ये - जा करण्याचा खर्च दिला जात असल्याचीही माहिती आहे. गावातील मतदार यादीत अनेक वर्षांपासून नावे असताना शासन स्तरावर अशा याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत नाही. गावात मतदार याद्या पुनर्गठन करतानाही या बाबी लक्षात घेतल्या जात नाहीत. यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सर्वत्र गोंधळ निर्माण होत आहे. मतदानाकरिता दोन वा यापेक्षा अधिक पॅनलमध्ये रणसंग्राम होताना दिसून आला आहे.
बॉक्स
आशा स्वयंसेविकांमार्फत सर्वेक्षण करा
गावात नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना गावातील इत्थंभूत माहिती आहे. मृतक आणि विवाहिता मुलींची त्यांना माहिती आहे. या आशा स्वयंसेविकांना सरसकट सर्वेक्षण करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यांचे सर्वेक्षण अधिकृत करण्याची मागणी होत आहे. यामुळे मतदार यादीत घोळ राहणार नाही. प्रत्येक वर्षात मयत झालेल्यांची नावे वगळण्याची प्रक्रियाही राबविण्याची गरज आहे.