‘डिफेन्स सर्व्हिसेस’चा नमीत जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 05:00 AM2022-06-09T05:00:00+5:302022-06-09T05:00:28+5:30
शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजची इयत्ता बारावीची ही द्वितीय बॅच असून नमीत व्यवहारे याने ६०० पैकी ५७० गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नमीतने याच वर्षी नॅशनल डिफेन्स अकाडमी व सर्व्हिसेस सिलेक्शन बाेर्ड (एसएसबी)ही सर्वात कठीण परिक्षाही उत्तीर्ण केली आहे. याच काॅलेजचे दहा विद्यार्थी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
इंद्रपाल कटकवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९७.३० टक्के लागला असून तालुक्यातील शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजचा विद्यार्थी नमीत मनिष व्यवहारे हा ९५ टक्के गुण घेवून विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे.
कला शाखेतून भंडारा येथील नूतन कन्या शाळेची कीर्ती कुवरलाल दमाहे ही प्रथम तर जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा येथील विशाल नरेंद्रकुमार ग्वालानी हा वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम आला आहे. जिल्ह्याच्या निकालात भंडारा जिल्हा हा नागपूर विभागातून द्वितीय स्थानी आहे.
मार्च २०२२ च्या उच्च माध्यमिक शालांत परिक्षेला एकूण १७ हजार ६९० विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १७ हजार ६२७ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी १७ हजार १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजची इयत्ता बारावीची ही द्वितीय बॅच असून नमीत व्यवहारे याने ६०० पैकी ५७० गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नमीतने याच वर्षी नॅशनल डिफेन्स अकाडमी व सर्व्हिसेस सिलेक्शन बाेर्ड (एसएसबी)ही सर्वात कठीण परिक्षाही उत्तीर्ण केली आहे. याच काॅलेजचे दहा विद्यार्थी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय नानाजी जाेशी विद्यालयाचा निकालही १०० टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे डिफेन्स सर्व्हिस ॲकाडमीचे प्रा. नरेंद्र पालांदूरकर, एसजीबीच्या प्राचार्य वंदना लुटे, संचालक प्रसन्ना पालांदूरकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.
जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून द्वितीय येण्याचा मान नूतन कन्या शाळेची विद्यार्थिनी चिन्मयी चंद्रकांत बालपांडे हिने प्राप्त केला आहे. तिला रसायनशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. याच शाळेची वाणिज्य शाखेतून तनिषा लक्ष्मण सेलाेकर ही ९४.१७ टक्के गुण घेत जिल्ह्यातून द्वितीय आली. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव ॲड. एम. एल. भुरे, प्राचार्य सीमा चित्रीव, सहसचिव शेखर बाेरसे, पालक व शिक्षकांनी काैतुक केले आहे.
याशिवाय लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील समीक्षा सुरेश धुर्वे व तुमसर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी अदिती राजकुमार समरगडे हे दाेघेही संयुक्तपणे विज्ञान शाखेतून तृतीय आले आहेत. दाेघांनाही ९३.३३ टक्के गुण आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा कनिष्ठ महाविद्यालयांच्यावतीने त्यांच्या घरी जावून सत्कार करण्यात आला. साेशल मीडियावरही विद्यार्थ्यांवर काैतुकाचा वर्षाव हाेत हाेता.
नमीतला व्हायचयं डिफेन्स ऑफीसर
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी असलेल्या तथा भंडारा जिल्ह्यात अव्वल आलेला नमीत व्यवहारे याला डिफेन्समध्ये कॅरिअर घडवायचे आहे. ऑफीसर म्हणून कारकिर्द घडवायची असा चंग बांधून त्याने एनडीए व एसएसबीची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. नमीतचे वडील महसूल विभागात कार्यरत असून आई हरशाली या गृहिणी आहे. अत्यंत चिकाटी व अभ्यासात सातत्यपणामुळे मला हे यश मिळाल्याचे नमीतने लाेकमतशी बाेलताना सांगितले.
निकालात यंदाही मुलींची भरारी
- बारावीच्या परीक्षेसाठी ९०९६ मुलांनी तर, आठ हजार ५९४ मुलींंनी नोंदणी केली होती. टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली आहे. निकालात ९६.४५ टक्के मुलं पास झाली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.१९ टक्के इतकी आहे.
१८३३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
इयत्ता बारावीच्या परीक्षेत भंडारा जिल्ह्यातून १७१५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १८३३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. ७ हजार ८४३ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर द्वितीय श्रेणीत ६ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची परीक्षा शालेय स्तरावर घेण्यात आली हाेती. त्यामुळे विद्यार्थ्यांना माेठे यश मिळाले.