भंडारातील पूर बाधितांच्या बचावासाठी नाना पटोले मैदानात; तातडीने मदत देण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:01 PM2020-08-30T18:01:11+5:302020-08-30T18:01:22+5:30
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लाखांदुर तालुक्यात भेटीला
भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे लाखांदुर तालुक्यात दौऱ्यावर असुन त्यांनी लाखांदूर तालुक्यातील खैरना, मोहरना गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली व पूरबाधित लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन अन्य लोकांनाही तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. शेतीतील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश पटोले यांनी दिले असुन पूर बाधित गावांना मदत व बचाव कार्याचा पटोले यांनी आज आढावा घेतला. पूर बाधितांना तातडीने मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. काही घरांचे अंशतः तर काही घरांचे पूर्णतः नुकसान झाले. अनेक गोठयांचे सुद्धा नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसान भरपाईसाठी तसेच गोठयांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व गावांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पटोले यांनी दिले. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. सर्व ठिकाणी विज पुरवठा सुरु कसा ठेवता येईल यादृष्टीने देखील विज वितरण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाने सतर्क राहावे-
नद्यांना पूर आल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या विसर्गामुळे भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना धोका होऊ शकतो, ही परिस्थिती लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे, तसेच पुरामुळे विविध प्रकारचे आजार देखील वाढू शकतात त्यादृष्टीने आरोग्य विभागाने देखील तयार राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य धोका असणाऱ्या गावात तातडीने मदत पोहोचवण्याचे नियोजन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यासाठी असलेले सर्व संपर्क क्रमांक देखील 24 तास सुरू ठेवण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.