विवाहितेच्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नणंदेला पाच वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 05:00 AM2022-06-23T05:00:00+5:302022-06-23T05:00:06+5:30
उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणी २१ जून रोजी न्या. खुणे यांनी सविताला पाच वर्ष सश्रम कारावास तसेच ४९८ (अ) व ॲट्राॅसिटी अंतर्गत प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी हजार रुपये द्रव्य दंडाची व दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या वहिनीचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नणंदेला पाच वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सविता शंकर बावणे (२९) रा. डव्वा (धारगाव) असे महिला आरोपीचे नाव आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी दिला.
माहितीनुसार, साकोली तालुक्यातील वडेगाव येथील लाला जयराम बांबोर्डे यांची मुलगी डिम्पल हिचा आंतरजातीय विवाह भंडारा तालुक्यातील डव्वा धारगाव येथील नरेंद्र ऊर्फ मुन्ना कोसरे याच्यासोबत २०१६ मध्ये झाला. लग्नानंतर डिम्पल ही डव्वा येथे असताना विवाहित असलेली तिची नणंद सविता बावणे ही सुद्धा डव्वा येथे होती. आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून वहिनी डिम्पल कोसरे हिचा ती सातत्याने छळ करीत होती. जातीय द्वेषामुळे डिम्पल प्रचंड त्रासली होती. मानसिक व शारीरिक त्रास असह्य झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत डिम्पल कोसरे हिचे वडील लाला बोंबार्डे यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी ९ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी केला. तपासाअंती डिम्पलची नणंद सविता बावणे ही डिम्पलला आंतरजातीय प्रेमविवाह व जातीय द्वेषामुळे तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे दिसून आले. तिला अटक करून प्रकरण जिल्हा व सत्र न्यायायलात प्रविष्ट करण्यात आले.
सुनावणीदरम्यान न्या. पी. एस. खुणे यांच्यासमक्ष सरकारी पक्षातर्फे ॲड. दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणी २१ जून रोजी न्या. खुणे यांनी सविताला पाच वर्ष सश्रम कारावास तसेच ४९८ (अ) व ॲट्राॅसिटी अंतर्गत प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी हजार रुपये द्रव्य दंडाची व दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. दुर्गा तलमले यांनी, तर पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एसडीपीओ विजय डोळस, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अमलदार विनोद बघेल यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
ॲट्राॅसिटीअंतर्गत कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा
- लाला बोंबार्डे यांच्या तक्रारीनंतर सविता बावणेविरुद्ध साकोली पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणे यासह अनुसूचित जाती जनजाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यात ॲट्राॅसिटीअंतर्गत सविता बावणे हिला एकूण विविध कलमांतर्गत प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांची द्रव्यदंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सविताला विविध कलमांतर्गत ठोठावण्यात आलेली शिक्षा सोबतच भोगायची आहे.