एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनविली नॅनो कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:46 PM2018-05-09T22:46:39+5:302018-05-09T22:46:39+5:30
शिस्तबद्ध वातावरणात, उत्तम मार्गदर्शनाला प्रयत्न व चिकाटीची जोड मिळाली तर कोणतेच काम कठीण नाही. स्थानीक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ ३५ हजार रूपयात नॅनो कार बनवून या गोष्टीची साक्ष पटवून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : शिस्तबद्ध वातावरणात, उत्तम मार्गदर्शनाला प्रयत्न व चिकाटीची जोड मिळाली तर कोणतेच काम कठीण नाही. स्थानीक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ ३५ हजार रूपयात नॅनो कार बनवून या गोष्टीची साक्ष पटवून दिली आहे.
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर कमी खर्चात बनणारी, कमी इंधनाचा वापर करणारी, सर्व प्रकारच्या रस्त्यावर, मैदानी प्रवेशात, शेतात धावू शकणारी ड्रायव्हींग न येणाऱ्या माणसालाही चालवता येण्याजोगी, अशी कार जी वजनाने हलकी असावी व चालवायला पूर्णत: सुरक्षित असावी.
अशा प्रकारची गाडी बनविण्याचे स्वप्न आशिष कांबळे, महेश राऊत, तिर्थराज गोटेफोडे, स्वप्नील लाडे, सौरभ भुरे, पंकज पटले, समीर फारुखी, अविनाश जगनाडे, शुभम भाजीपाले आणि अंकीत गाडगे या एमआईईटी मध्ये यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी पाहिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष नशिने यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली व प्रा.गिरीश भिवगडे, प्रा.अमीत नंदागवळी व प्रा.अमर भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांच्या अविरत प्रयत्नांनी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये या कारची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या कारमध्ये अॅक्टीवाचे इंजीन लावण्यात आले असून सर्व पार्टस् स्थानिक पातळीवरून खरेदी करून जोडण्यात आले आहेत. ३५ हजार रूपयांच्या अल्प खर्चात संपूर्ण कार तयार करण्यात आलेली आहे. ही कार तासी ४० ते ५० किलोमीटर वेगाने धावू शकते.
सदर कारमध्ये चारही चाकात ‘हॉयड्रायुलीक ब्रेकींग सिस्टम’ लावण्यात आले असून पूर्णत: ट्युब्युलर फ्रेममध्ये याची रचना करण्यात आली असल्यामुळे ती चालवायला पूर्णत: सुरक्षित व वजनाने हलकी आहे.
या कारची विशेषत: म्हणजे ती रस्त्यावर व रस्त्याबाहेर म्हणजे मैदानी, दगडी प्रदेशात शेती शिवारात कुठेही आरामात चालवता येवू शकते. ग्रामीण भागासाठी ही कार संजीवनी ठरू शकते. ती तिच्या कमी किमतीसोबत बहुउपयोगी वापरासाठी शेतात फवारणी करणे, पाहणी करणे, बीज फोकणे या कामांसाठी ही कार उपयोगात येवू शकते.
किटनाशक फवारणी मुळे शेतकरी विषबाधीत होण्याचे प्रमाण मागील काही वर्षापासून खुप वाढले आहे. या कारद्वारे बंद द्वार किटनाशक फवारणी करून शेतकरी आपला वेळ, श्रम व अमोल जीवही वाचवू शकतात.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष नशिने यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत अनुबंधाद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व नवनवीन कल्पक प्रयोगाद्वारे स्टॉर्ट अप इंडियासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित व प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
सदर कारचे परीक्षण व चाचणी एमआईईटीच्या विविध प्रयोगशाळेत करण्यात आली व त्यात सर्व परिक्षणात विद्यार्थ्यांनी बनविलेली ही कार यशस्वी झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आशिष नशिने, डॉ.प्रल्हाद हरडे, मार्गदर्शक प्रा.गिरीश भिवगडे, प्रा.अमीत नंदागवळी, अमर भिवगडे तसेच शिक्षक गैर शिक्षक कर्मचाºयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.