भंडाऱ्यात १६ गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नष्ट करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:18 PM2023-06-24T20:18:26+5:302023-06-24T20:19:00+5:30
२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो. अंमली पदार्थामध्ये गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर, हेराॅईन, चरस, एमडीए, मेफेड्रोन आदी प्रमुख पदार्थाचा समावेश होतो.
देवानंद नंदेश्वर
भंडारा : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यात एनडीपीएस सदराखाली न्यायालयातून निकाली लागलेल्या एकुुण १६ गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ ३९४.८३५ किलो गांजा, २९.५७९ ग्रॅम ब्राऊन शुगर असा मुद्देमाल समितीच्या समक्ष नष्ट करण्यात येणार आहे.
२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो. अंमली पदार्थामध्ये गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर, हेराॅईन, चरस, एमडीए, मेफेड्रोन आदी प्रमुख पदार्थाचा समावेश होतो. अंमली पदार्थाच्या उत्पादन, विक्री वाहतूक, सेवन यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने १०८५ साली गुंगीकारक पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू, आरोग्य ढासाळणे, ह्दयाची स्पंदने वाढणे, झोप न येणे. बेशुध्द होणे, नाकातून रक्त येणे, श्वसनाचा त्रास होणे, दात शिवशिवणे, शरीर थरथर कापणे आदी गंभीर परिणाम माणसाचे शरीरावर होतात. काही अंमली पदार्थाचे रुग्ण आत्महत्येलाही प्रवृत्त होतात. तरुणांनी काॅलेज जीवनाचा आनंद घेतेवेळी अंमली पदार्थाच्या मार्गाचा अवलंब करु नये.
अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे परिणाम व नागरीकांनी अंमली पदार्थाच्या आहारी न जाता प्रत्येकाने चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, काही वेळा प्रलोभनामुळे तरुण पिढी अंमली पदार्थ घेण्याकडेही वळते. मात्र त्यामुळे त्या नागरीकांचे आयुष्य बरबाद होते, म्हणून अशा धोकादायक पदार्थापासून दूर रहावे, तरुणांनी व्यायाम, क्रीडा क्षेत्र वाचन याची आवड बाळगावी. अंमली पदार्थाच्या विक्रीबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास नजिकच्या पोलीस ठाणेला कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस विभागाने केल आहे.