उड्डाणपुलाच्या राखेने राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:48 AM2019-08-11T00:48:57+5:302019-08-11T00:50:32+5:30
लगतच्या देव्हाडी उड्डाण पुलाच्या राख समस्येवर उपाय म्हणून व्हायब्रेटींग करण्यात आले. मात्र त्यानंतरही पावसात पुलाच्या भरावातून राख वाहत आहे. परिणामी हा उड्डाणपूल जीवघेणा ठरत आहे. राखेवरून भरधाव वाहने घसरून अपघात होण्याची कायम भीती असून आता जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लगतच्या देव्हाडी उड्डाण पुलाच्या राख समस्येवर उपाय म्हणून व्हायब्रेटींग करण्यात आले. मात्र त्यानंतरही पावसात पुलाच्या भरावातून राख वाहत आहे. परिणामी हा उड्डाणपूल जीवघेणा ठरत आहे. राखेवरून भरधाव वाहने घसरून अपघात होण्याची कायम भीती असून आता जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे रेल्वेफाटकाजवळ उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आला. गत चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र यावर्षी भरावातील राख पाण्यासह मोठ्या प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे पोचमार्ग पोकळ होवून मोठे भगदाड व खड्डे पडणे सुरू झाले आहे. चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. संपूर्ण पुलातून राख वाहत आहे. बँकॉक महाराष्ट्र शाखेसमोर पुलातून राख वाहून राष्ट्रीय महामार्गावर पसरली आहे. रस्ता निसडा झाला आहे. दुचाकी वाहने त्यावरून घसरत आहे. चारचाकी वाहने स्लिप होवून अपघाताची भीती वाढली आहे.
देव्हाडी येथील हा उड्डाणपूल समस्याग्रस्त झाला असून यासंबंधी चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे. तर हा पूल पुन्हा नव्याने बांधण्याची मागणी खुशाल नागपुरे, सरपंच रिता मसरमे, श्याम नागपुरे, प्रदीप बोंद्रे, श्यामसुंदर नागपुरे यांनी केली आहे.
दहा दिवसापुर्वी जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी देव्हाडी उड्डाण पुलाला भेट देवून पाहणी केली. तेथे व्हायब्रेडरचा उपयोग करून राखेवर दाब देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सदर माहिती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांना दिली. परंतु पुन्हा पावसात मोठ्या प्रमाणात राख वाहने सुरू झाले आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु याकडे कोणाचे लक्ष नाही.