राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा समावेश : दररोज शेकडो ट्रक नागपूरला होतात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:35 PM2019-05-21T23:35:58+5:302019-05-21T23:36:16+5:30
सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाकरिता रेतीची अत्यंत गरज असून चोरीच्या रेतीवर शासकीय कामे धडाक्यात सुरु आहेत. नागपूर येथील मेट्रोचे बांधकाम तथा मनसर,तुमसर,गोंदिया राष्ट्रीय महामार्ग बांधकामे चोरीच्या रेतीवर सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोट्यवधींची कामे धडाक्यात सुरु असून सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाकरिता रेतीची अत्यंत गरज असून चोरीच्या रेतीवर शासकीय कामे धडाक्यात सुरु आहेत. नागपूर येथील मेट्रोचे बांधकाम तथा मनसर,तुमसर,गोंदिया राष्ट्रीय महामार्ग बांधकामे चोरीच्या रेतीवर सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोट्यवधींची कामे धडाक्यात सुरु असून सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रेतीकरिता संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. बावनथडी वैनगंगा नदीचे पात्र रेती तस्करांनी पोखरुन टाकले आहे. मध्यप्रदेशाच्या सीमेत तीच स्थिती आहे. बोगस टीपींचा काळाबाजारही सर्रास सुरु आहे. दोन्ही राज्यातील महसूल प्रशासन येथे हतबल दिसत आहे. तिरोडा, तुमसर तथा मध्यप्रदेश हे रेती पुरवठा कणारे प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. नागपूर येथील मेट्रो बांधकामाकरिता सर्वात जास्त रेती तुमसर तालुक्यातून गेल्याची धक्कादायक माहिती आहे. मनसर-रामटेक तुमसर -गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे सीमेंट रस्त्याची कामे धडाक्यात सुरु करण्यात आली. प्रकरण उघडकीस आल्यावर सध्या कामे अगदी संथगतीने सुरु आहेत.
घाट लिलाव नसताना रेती आली कुठून हा संशोधनाचा विषय आहे. सदर प्रकरणाची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आल्याची माहिती आहे. मागील सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग बांधकामाची गती जोमात होती. ती अचानक थंडावली.तालुक्यातील घाटांचा कार्यकाळ संपला, तक्रारी वाढल्या. त्यामुळे रस्ता बांधकामाला ब्रेक लावण्यात आल्याचे समजते.
उन्हाळा आहे, पाण्याची कमतरता असल्याचे कारण पुढे करण्यात आले. परंतु रेतीचा पुरवठा कमी झाल्याने कामांची गती मंदावल्याचे समजते. सीमेंट काँक्रीट रस्ता बांधकामे येथे रात्रीच करण्यात येत होती हे विशेष. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आक्षेप घेतला नाही हे विशेष.
भंडारा जिल्ह्यात अवैध रेती खनन प्रकरण मुंबई पर्यंत पोहचले आहे. राजकीय पाठबळामुळे महसूल प्रशासनाने येथे नांगी टाकली आहे.
टीपीवर प्रश्नचिन्ह
सध्या रामटेक, नागपूर तथा इतर ठिकाणी जाणारी रेती मध्यप्रदेशच्या टीपीवर वाहतूक केली जात आहे. येथे टीपीचा गोरखधंदा सुरु असल्याचा प्रकार पुढे येत आहे. परंतु त्याची शोधमोहीम कुणीच राबविताना दिसत नाही. महसूल प्रशासनाने भरारी पथक तयार केली. त्याचाही येथे फायदा होताना दिसत नाही. एक मोठे रॅकेट येथे सक्रीय आहे.
उच्चस्तरीय चौकशी सुरु
मेट्रो तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या हजारोंचा प्रकल्प सध्या सुरु आाहे. यातील प्रमुख घटक रेती असून यातील कामांवर एकुण रेतीचा वापर व त्यासंदर्भात माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागितल्याचे समजते. सध्या येथे सारवासारव सुरु असून कामे जैसे थे ठेवण्याचे आदेश प्राप्त झाल्याचे समजते. दि. २३ मेनंतर येथील कामांची दिशा ठरणार असल्याचे समजते.
चोरीच्या रेतीवर शासकीय कामे सुरु आहेत. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आाहे. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. केवळ थातुरमातूर चौकशी केली जाते. आजपर्यंत ठोस कारवाई झाली नाही. घाट बंद असताना शेकडो रेतीचे ट्रक येतात कुठून व जातात कुठे हा प्रश्न येथे आहे.
-विठ्ठलराव कहालकर, राकाँ अध्यक्ष, तुमसर-मोहाडी.