नैसर्गिक पद्धतीची शेती बनतेय काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:51 PM2019-04-30T21:51:19+5:302019-04-30T21:52:03+5:30
जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.
शेतीला शेणखत, शेळी, मेंढी खत, हिरवळीची खते, ताग यासारख्या खतांनी जमीनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांची मात्रा देणे गरजेचे आहे, असे केलेतरच जमीन भुसभुसीत, उत्पादनास अनुकूल अशी राहिल. शेणखत, मेंढीखत, गांढूळखत, ताग हिरवळीचे खत ही जमिनीची पोषण आहार असून त्यांचा उत्पादन वाढीसाठी फायदा होतो
रासायनिक खताचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याने अलिकडील काळात अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यासाठी परसोडी मुख्यालयातील चिखली येथे सेंद्रीय पध्दतीच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. अनुभव आलेले अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने सेंद्रीय शेती करु लागले आहेत.
चिखली येथे कृषी सहायक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनातून तानाजी गायधने यांनी सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी मिलिंद लाड यांनी त्यांच्या शेतावर भेट देवून पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना देशी गाईबद्दल माहिती देवुन त्यातून होणाऱ्या फायद्याची आणि नवनवीन उत्पादनाबद्दलची यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीदरम्यान कृषी अधिकारी मिलिंद, कृषी सहायक रेणुका दराडे, शेतकरी तानाजी गायधने, गावातील महिला शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कृषीमित्र शाम आकरे व प्रगतशील शेतकरी यांना नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचनाच्या सुविधांची साधने वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
अभ्यास दौऱ्यातील आलेले अनुभव महिला शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनीही एकत्र येत गटशेतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला. महिला शेतकºयांसह प्रगतशील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थिती होती.
कमी खर्चात जमिनीची सुपिकता
जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चात ताग, शेणखत, हिरवळीच्या खतांची मदत होते. नैसर्गिक साधनांचा वापर करुन कमीत कमी खर्चात नैसर्गिक शेती कशी करावी यांची मार्गदर्शन होणार आहे. गोमुत्र, शेण, जीवामृत, बीजमृत घरच्या घरी बनवून शेतकऱ्यांना त्यांचा वापर प्रत्यक्ष शेतीत कसा करावा, पाण्याचे नियोजन वेगवेगळ्या हंगामात आलटून पालटून पिके शकी घ्यावी, कमी जागेत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबतही शेतकºयांना खरीप संभामधून मार्गदर्शन होणार आहे.