नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त, मुरूम तस्करांचा धुमाकूळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:47 PM2024-08-31T12:47:44+5:302024-08-31T12:48:26+5:30

गडकुंभली परिसरातील प्रकार : मुरूम उत्खननाची परवानगी नाही

Natural hills destroyed, Murum smugglers increased | नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त, मुरूम तस्करांचा धुमाकूळ !

Natural hills destroyed, Murum smugglers increased

लोकमत न्यूज नेटवर्क 
साकोली :
तालुक्यात रेती चोरीसोबतच मुरूम चोरीचे प्रमाण वाढले आहे. गडकुंडली व परिसरात नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त करून दररोज मुरूम या गौण खनिजाची चोरी सुरू आहे. रोज येथून ६० ते ७० ट्रॅक्टर मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. यामुळे नैसर्गिक टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मुरूम तस्करांच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर नैसर्गिक टेकड्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. महसूल प्रशासनाने येथे कडक कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.


साकोली गडकुंडली या केवळ हाकेच्या अंतरावर गडकुंडली हे गाव आहे. या गावाच्या परिसरात पहाडी रस्त्याशेजारी गौण खनिज मुरूम मोठ्या प्रमाणात आहे. येथे मोठ्या टेकड्या असून, त्यात मुरूमाचा मोठा साठा आहे. परिसरातील जमिनीतही मुरूम मोठ्या प्रमाणात आढळतो. 


साकोली तालुक्यात नैसर्गिक टेकड्या आहेत. त्या टेकड्या मुरूम तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केल्या आहेत. यापूर्वी या टेकड्यांमधून रस्त्याच्या बांधकामाकरिता रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मुरूम घालण्यात आला होता. महसूल प्रशासनाकडून यासाठी रितसर परवानगी घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. परंतु, अतिशय कमी ब्रासची परवानगी येथे घेण्यात आली होती. रस्त्याच्या कामावर तसेच घर बांधकामातील भरावात मरूमाचा वापर केला जातो. शहरात या मुरूमाला मोठी मागणी आहे. त्या संधीचा फायदा घेत परिसरातील मुरूम तस्कर सक्रिय झाले आहेत. 


मुरूमाची चोरी सुरूच 
दररोज ६० ते ७० ट्रॅक्टर मुरूमाचे या परिसरातून उत्खनन केले जात आहे. मुरूमाची रस्त्याच्या कामावर तसेच शहरात विक्री केली जाते. शहरातून मुरूमाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावतात. त्यावर मोठी कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे मुरूम तस्करांचे फावत आहे. मुरूम तस्करी करणारे याच परिसरातील आहेत. मुरूम तस्करी करणाऱ्यांचे येथे मोठे रॅकेट असून, रेती तस्करांसारखीच त्यांची टोळी येथे बऱ्याच महिन्यांपासून सक्रिय आहे.


रॉयल्टी ५० ट्रिपची, उत्खनन २०० ट्रिप
साकोली तहसील कार्यालयातून मुरूम ठेकेदार ५० ट्रिपची रॉयल्टी घेतात व त्याऐवजी २०० ते २५० ट्रिप मुरूमाचे उत्खनन करतात. तलाठी व तहसीलदार यांना मॅनेज करून हे प्रकार सुरू असतात. याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.
 

Web Title: Natural hills destroyed, Murum smugglers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.