नवेगाव नागझिऱ्यात वाढला पर्यटकांचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:56 AM2018-07-13T00:56:34+5:302018-07-13T00:57:37+5:30
भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या.
शिवशंकर बावनकुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या.
भारतातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून उदयास आलेल्या या व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांनी भुरळ घातली आहे. वाघ, नीलगाय, बिबट, सांबर, रानगवे, हरिण, अस्वल, रानकुत्री यासारखे वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने येथे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. एप्रिल १७ ते मार्च १८ पर्यंत ४६ हजार ९३२ पर्यटकांनी येथे जंगल सफारी केली आहे. यात १२ वर्षाखालील पाच हजार २८६ तर १२ वर्षावरील ४१ हजार २५७ पर्यटकांचा समावेश आहे. तसेच एकुण ६५ विदेशी पर्यटकांचे सुद्धा आगमन झाले आहे.
एप्रिल ते जून २०१७ मध्ये १८ हजार ४१४ पर्यटकांनी भेटी दिल्या असून त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार ५९८ रुपये, आॅक्टोबर २०१७ मध्ये ४२४४ पर्यटकांकडून १ लाख ६ हजार ४३५ रुपये, नोव्हेंबर २०१७ मध्ये १९९४ पर्यटकांकडून १ लाख ४० हजार ९३५ रुपये, डिसेंबर १७ मध्ये ७ हजार ३६४ पर्यटकांकडून ३ लाख २१ हजार ९७० रुपये, जानेवारी १८ मध्ये ५ हजार ६५४ पर्यटकांकडून २ लाख ५३ हजार ८८० रुपये, फेब्रुवारी १८ मध्ये ३ हजार ११० पर्यटकांकडून १ लाख ३१ हजार ८७२ रुपये व मार्च १८ मध्ये ५ हजार १५१ पर्यटकांकडून २ लाख ४ हजार ५१० रुपये असे एकुण ४६ हजार ९३२ पर्यटकांकडून २० लाख ६६ हजार २३० रुपयाचा महसूल गोळा झाला आहे.
तसेच संपूर्ण आर्थिक वर्षात पर्यटनासाठी एकुण ८९ जड तर ५७५ हलके अशा एकुण ८ हजार ६२८ वाहनांचा उपयोग करण्यात आला. या वाहनांसाठी ११ लाख १५ हजार ३९० रुपयांचा प्रवेश शुल्क वसुल करण्यात आला. तर पर्यटकांनी उपयोग केलेल्या २ हजार ५४५ कॅमेरा वापरातून २ लाख ५१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
पर्यटकांकडून वसुल करण्यात आलेली रक्कम, वाहनांसाठी वसुल केलेली प्रवेश शुल्क व कॅमेरा शुल्क असा एकुण ३५ लाख ३९ हजार ६७० रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाला प्राप्त झाला आहे. पर्यावरणपुरक साधनांची निर्मिती, व्यवस्थापन व पर्यटकांचे हित जोपासणाºया अधिकारी, कर्मचाºयांमुळे हे चित्र दिसून येत आहे.