नवनीतचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:55 AM2019-06-24T00:55:30+5:302019-06-24T00:56:02+5:30
रोहा रेती घाटावर रात्रीच्या वेळी नवनीतचा जेसीबी मशीनचा पंजा लागून तो मृत पावला असा बनाव करण्यात आला. मात्र त्याचा खून करण्यात आल्याचा दाट संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाड़ी : रोहा रेती घाटावर रात्रीच्या वेळी नवनीतचा जेसीबी मशीनचा पंजा लागून तो मृत पावला असा बनाव करण्यात आला. मात्र त्याचा खून करण्यात आल्याचा दाट संशय आहे. माझ्या मुलाला घरून बोलावून नेणाऱ्या चेतन ऊकेटेके व जेसीबीच्या चालकाची नार्को चाचणी करण्यात यावी, सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृतकाची आई लीला सिंदपुरे यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.
१७ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान चेतन तेजराम ऊकेटेके याने घरी येऊन नवनीतला बाहेर नेले, दुसºया दिवशी सकाळी नवनीत घरी परत न आल्यामुळे याबाबत चेतनला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
नवनीत हा नदीत झोपला असेल जाऊन पहा असे बोलला, आम्ही सर्व नदीत जाऊन बघितले असता नवनित हा मृतावस्थेत आढळला. नवनीतला जेसीबीचा पंजा लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले मात्र जर जेसीबीने मृत्यू झाला असता तर नवनीतचे शव सुस्थितीत राहिले नसते, तो तडफडला असता व त्याचे कपडे व पायातील चप्पल अस्तव्यस्त पडलेली असती मात्र त्याचे कपडे व चप्पल सुव्यवस्थित अवस्थेत होते.
डोक्याला सळाखीचा मार लागल्याचे दिसत होते, जर जेसीबीचा पंजा लागला असता तर डोक्याला गंभीर दुखापत दिसायला हवी होती, मात्र असे आढळले नाही, पोलिसांनी सुद्धा घटनास्थळावरील पंचनामा चुकीच्या पद्धतीने केला, पंचनाम्यात मृतकाच्या शरीराचे सविस्तर वर्णन जसे जखमा कोठे आहेत, शरीरावरील निशाणी इत्यादीचा उल्लेख केलेला नाही, यात रेती माफियांचा हात असून याला एका राजकीय नेत्याचे सुद्धा सहयोग प्राप्त आहे. ज्या जेसीबीने अपघात झाल्याचे सांगण्यात येते व ज्या जेसीबीला जप्त करण्यात आले. त्या जेसीबीला हाताने रक्त लावल्याचे स्पष्ट दिसत होते. याचाच अर्थ नवनीतचा खून करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्यात आले, हे स्पष्ट होते.
रोहा रेतीघाट लिलाव झालेला नसताना सुद्धा रेती घाटावर रात्रीच्या वेळी जेसीबी का म्हणून नदीत टाकण्यात आली होती, याची सुद्धा चौकशी करण्यात आलेली नाही. ज्यावेळी नवनीतचा अपघात झाला तर त्याला दवाखान्यात का नेण्यात आले नाही, तसेच अपघाताची सूचना नवनीतच्या आईला का देण्यात आली नाही. अपघात कशाप्रकारे घडला याचीही पोलिसांनी सविस्तर चौकशी केलेली नाही. रेती माफियांनी कटकारस्थान करून नवनीतचा खूनच केला आहे, असा आरोप नवनीतची आई लिला सिंदपुरे यांनी पत्रपरिषदेतून केला. नवनीत ला घरून बोलावून नेणाºया चेतन उकेटेके व जेसीबी चालकाची नार्को चाचणी करण्यात यावी व या प्रकरणात सीआयडी मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी सुद्धासिंदपुरे केली आहे. पत्रपरिषदेला मृतकाची आई लीला सिंदपुरे, सीमा मेश्राम, किरण अतकरी, दिगंबर माने, सावन मेश्राम, परमेश्वर मेश्राम, साजन मेश्राम इत्यादी उपस्थित होते.