नवोदय विद्यालय बंद होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:51 PM2018-07-01T21:51:03+5:302018-07-01T21:52:35+5:30
१८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले नवोदय विद्यालय वर्षभरातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनासह केंद्र शासनाची उदासीनता विद्यालयाच्या अस्मितेवर वार करणारी ठरली आहे.
इंद्रपाल कटकवार/ देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले नवोदय विद्यालय वर्षभरातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनासह केंद्र शासनाची उदासीनता विद्यालयाच्या अस्मितेवर वार करणारी ठरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
१९९९ मध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विभागणी झाल्यानंतर नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले. त्यानंतर सातत्याने भंडारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र जवाहर नवोदय विद्यालय व्हावे यासाठी लढा सुरू होता. जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला न्याय मिळाला. सत्र २०१७ पासून भंडारा जिल्ह्याला नवोदय विद्यालय सुरु होत असल्याची घोषणा होऊन विद्यालय ही सुरुझाले. यात प्रथम सहाव्या वर्गात ४० विद्यार्थ्यांची नोंदणी होवून नियमित अभ्यासक्रमालाही सुरुवात झाली. नवोदय विद्यालयाची प्रशस्त व सर्व सुविधायुक्त जागा मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे निश्चित करण्यात आली आहे. मात्र जागा हस्तांतरण अभावी अजूनही बांधकाम सुरु झालेले नाही. परिणामी जि.प. च्या मालकीमध्ये असलेल्या जकातदार विद्यालयाच्या परिसरातील जुन्या इमारतीला डागडुजी करुन त्याठिकाणी नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले. मात्र शनिवारी बांधकाम विभाग भंडाराने सदर इमारत जिर्ण असून वापरण्यास अयोग्य आहे, ती इमारत खाली करावी, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जकातदार विद्यालयाच्या प्राचार्याना कळविला आहे. त्यामुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थी तथा पालकांसमोर आता काय करावे? असा मुख्य प्रश्न येवून ठेपला आहे.
पाच कोटींचा निधी मंजूर
मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे नवोदय विद्यालयाच्या बांधकामासाठी २२ एकर जागा अधिकृत करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासन (महसूल) व विभागीय आयुक्त यांच्या शासकीय दस्ताऐवजात जागा हस्तांतरणाचे काम रखडलेले आहे. परिणामी वर्षभरापासून शाळा सुरु होवूनही जागेची मालकीयत न मिळाल्याने बांधकामालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्राथमिक व पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी खितपत पडून आहे.
विद्यमान इमारतीत सुविधांचा अभाव
ज्या ठिकाणी नवोदय विद्यालय सुरु आहे, तिथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. तात्पूरत्या स्वरुपात का असेना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देणे शासनाचे ध्येय आहे.मात्र येथे या उद्दिष्टाला तिलांजली मिळत आहे. शाळा परिसरात कचरा, गवत व अन्य झाडीझूडपी वाढलेली आहेत. अशावेळी विषारी श्वापदांचा विचरण होणे स्वाभाविक गोष्ट आहे. मागील वर्षीची इयत्ता सहावीची बॅच व यावर्षीची नविन बॅच असे मिळून ८० मुलांची सोय या इमारतीत होवू शकत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तात्पूरत्या स्वरुपात जवाहर नवोदय विद्यालय सुरु असलेल्या जे. के. शाळेच्या सहा वर्गखोल्या आणि त्यासोबत असलेल स्वच्छता गृहांची दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरुन मागील व विद्यमान बॅच मधील विद्यार्थ्यांची सोय होवू शकेल. इमारत निकामी करण्याचे निर्देश मिळाल्याने वास्तु दुरुस्तीऐवजी सोडावी लागणार आहे.
पालक-प्राचार्यांमध्ये बैठक निष्फळ
एकीकडे सुविधांचा अभाव तर दुसरीकडे सुविधा देण्यात प्रशासनाची उदासिनता याचा सरळसरळ फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर जाणवू शकतो. अशा स्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी पालक व प्राचार्यांमध्ये बैठक झाली. प्राचार्य विजय अंबोरे यांनी वस्तुस्थिती पालकांसमक्ष सांगितली. यावर पालकांनी, पाल्यांना परत घेवून जावे की पर्यायी व्यवस्था होणार आहे. असा प्रश्न विचारताच प्राचार्य ही या प्रश्नाचे उत्तर द्यायला हतबल दिसले. जिल्हाधिकारी या समस्येवर तोडगा काढू शकतात व त्यासाठी पालकांचीही महत्वाची भुमिका आहे असे मत प्राचार्य अंबोरे यांनी पालकांसमोर व्यक्त केले. य्पालकांनीही बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने पाल्यांबाबत चिंता व्यक्त केली. पाल्यांना तेथून घेवून जाणार नाही अशी भूमिका घेवून यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना दाद मागू असा पावित्रा घेतला. दरम्यान खासदार मधुकर कुकडे सोमवारी विद्यालयाची पाहणी करणार आहेत.