नवोदय विद्यालय अन्यत्र हलविल्यास आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:56 PM2018-07-29T21:56:11+5:302018-07-29T21:56:35+5:30
१७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले.
Next
ठळक मुद्देप्रवीण उदापुरे : पत्रकार परिषदेत पालकांनी मांडल्या व्यथा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले. कोणत्याही क्षणी इमारत ध्वस्त होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला हानी पोहचू शकते. तथापि ५ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी यांनी पर्यायी व्यवस्था उभारून न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा सज्जड इशारा नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे व पालकांनी दिला आहे.
ते म्हणाले, जिल्हाधिकारी स्वत: नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष असून मुख्य पालक आहे. परंतु आजपर्यंत एकदाही त्यांनी विद्यालयाला भेट दिली नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे सदर प्रकरणाला घेऊन पालकवर्ग शासन दरबारी मागील तीन महिन्यांपासून येरझारा मारत आहेत. प्रत्येक वेळी निव्वळ आश्वासने देण्यात येत आहेत. नवोदय विद्यालयासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता संपूर्ण विद्यार्थी जिल्ह्याबाहेर नवेगावबांध तसेच वर्धा, नागपूर, बालाघाट जिल्ह्यात हलविण्याच्या प्रयत्नात आहेत.
पाचगाव येथे नवीन नवोदय विद्यालय निर्मितीचा प्रस्ताव अजूनपर्यंत थंडबस्त्यात आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाल्याने भंडारा जिल्ह्यात नवीन नवोदय येण्यास तब्बल १८ वर्षांचा उशिर झाला. परंतु हाती आलेला नवोदय विद्यालय प्रशासन पुन्हा रद्द करून बाहेरच्या जिल्ह्यात पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, असा इशारा नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी दिला आहे. नवोदय विद्यालयासाठी नवीन पर्यायी व्यवस्था ५ आॅगस्ट पर्यंत निर्मान न केल्यास ६ आॅगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ९ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी नवोदय विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आणून सोडणार असल्याचे सांगितले.
पत्रपरिषदेला नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांचेसह विद्यार्थ्यांचे पालक नरेंद्र कातोरे, विलास मोथरकर, शशीकांत गजभिये, प्रमोद नागदेवे, गणेश चेटुले, महेंद्र कठाणे, लक्ष्मण निंबार्ते, भगवान ढेंगे, विनोद बांगर आदी उपस्थित होते.