स्वयंभू चौंडेश्वरी देवी मंदिरात नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:46 PM2018-10-12T22:46:13+5:302018-10-12T22:46:29+5:30
मोहाडी येथील स्वयंभू व जागृत देवी माता चौंडेश्वरी मंदिरातही नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मोहाडी येथील स्वयंभू व जागृत देवी माता चौंडेश्वरी मंदिरातही नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
माता चौंडेश्वरी मंदिराला सहाशे वर्ष जूना इतिहास आहे. तीन दशकापूर्वी मंदिराचा अनेकांना ठाव ठिकाणाही नव्हता. त्यानंतर मंदिराचा विस्तार, विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आता वर्षभर भाविक नवस, पूजा करायला येत असतात. मनोभावे पूजा करणाऱ्या भाविकांची चौंडेश्वरी देवी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष स्वरूपात इच्छा आकांक्षाची पूर्ती करीत असते. देवस्थान समितीने चौंडेश्वरी देवी परिसराचे रूप पालटून टाकले आहे. अनेक सुविधांनी परिपूर्ण असे मंदिर आहे. धर्मशाळा, सभागृह, दुकानांची व्यवस्था, गोदाम बांधकाम, बगीचा, प्रसाधनगृह, पिण्याचे शुद्ध पाणी आदी काम केले गेले आहेत.
या उत्सवात सकाळी ५.१५ वाजता व सायंकाळी ६ वाजता आरती केली जाते. आम्रवृक्षांच्या कुशीत वसलेल्या माता चौंडेश्वरी मंदिर अधिकच खूलून दिसते. शेवटच्या दिवशी तर मोहाडीत नयनरम्य त्रीसंगळ सोहळा बघण्यासाठी मोठी गर्दी असते. दसºयाच्या दिवशी विद्यार्थी - युवक मंडळाचा महाप्रसाद, राजा रणदिवे यांच्या मंडळाचा रावण दहन कार्यक्रम व नवरात्र उत्सवाच्या अखेरच्या दिवशी भाविकांची मातेचे दर्शन घेण्यासाठी रिघ हा त्रीसंगम सोहळा बघण्याचा दुर्लभ योग येतो. नवरात्र उत्सवादरम्यान कमेटिचे प्रेमरतन दम्मणी, एकानंद समरीत, रमेश गोन्नाडे, बाळू बारई, किशोर पात्रे, शिवशंकर गभणे, अशोक कारंजेकर, अनिल पराते, संजय श्रीपाद आदी मदतीसाठी सहकार्य करीत आहेत.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मोहाडी येथील स्वयंभू माता चौंडेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रोत्सवात जिल्हाभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मातेची पूजा करून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, असे साकडे मातेला घालतात. नऊ दिवस उत्साहाला उधाण येणार आहे.