अखेरची घटका घेत असलेल्या शाळेला नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:08 PM2019-06-28T22:08:29+5:302019-06-28T22:09:04+5:30
येथील मालवीय नगरातील ऐतिहासीक स्वातंत्रपूर्व काळातील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा ही विद्यार्थी तसेच ईमारती अभावी अखेरची घटका मोजत असतांना ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला. शाळेचे डिजीटलायजेशन व कॉन्व्हेंट करुन शाळेला नवसंजीवनी देऊन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येथील मालवीय नगरातील ऐतिहासीक स्वातंत्रपूर्व काळातील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा ही विद्यार्थी तसेच ईमारती अभावी अखेरची घटका मोजत असतांना ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला. शाळेचे डिजीटलायजेशन व कॉन्व्हेंट करुन शाळेला नवसंजीवनी देऊन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
येथील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९०२ मध्ये सुरु करण्यात आली. स्थापनेला ११७ वर्षे पुर्ण झालेली ही शाळा आहे. मात्र विद्यार्थी संख्येत कमालीची घट झाल्याने शाळा शेवटची घटका घेत आहे. साधारणत: ९० च्या दशकापर्यंत संपुर्ण राज्यात गजबजलेल्या व गुणवत्ता संपन्न राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे व सद्यास्थितीत शिक्षण क्षेत्रातील खाजगी तसेच, बाजारीकरणामुळे शाळा डबघाईला लागल्या आहेत. खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढलेल्या ओढ्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे वास्तववादी चित्र समोर आहे. परिणामी जिल्हा परिषदच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांची संख्या जास्त पहावयास मिळते.
अनेक शाळा बंद आहेत. मात्र तुमसर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासीक वारसा ठरलेली ११७ वर्ष पुर्ण केलेल्या जिजामाता प्राथमिक शाळाही बंद होण्याच्या मार्गावर असतांना गट शिक्षणाधिकारी विजय आदमने, सर्व केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती विशेष शिक्षक आदींनी शाळेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरसावल.
या मोहीमेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची सांगड घालून जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळेला, डिजीटल स्कुल व कॉन्व्हेंट खर्चाने बनवून शैक्षणिक टॅब देखील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करुन त्याचा लोकार्पण शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर व सभापती रोशना नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच महत्व लक्षात घेता सभापती धनेंद्र तुरकर यांनी १५ लक्ष रुपये देण्याचे आश्वासन देवून शाळेला एक नवसंजीवनीच प्राप्त करुन दिली आहे.