कोरोना संकटात मदतीला धावून आली राष्ट्रवादी काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:54+5:30
जिल्ह्यातील एकाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर अन्नधान्य वितरण सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले. गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा संकटाच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल मदतीला धावून आले. त्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. रविवारी भंडारा शहरातील विविध भागात गोरगरिबांना मदतीचा हात देण्यात आला.
लॉकडाऊनमुळे सध्या रेल्वेसह सर्व वाहतूक सेवा ठप्प आहे. उद्योगधंदे बंद आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होत आहे. हाताला कामच नाही तर चुल कशी पेटवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्या खासदार प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आल्या.
जिल्ह्यातील एकाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर अन्नधान्य वितरण सुरु आहे.
खासदार प्रफुल पटेल यांनी यापूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीला एक कोटी रुपयांचा निधी दिला तर गोंदिया, भंडारा जिल्हा प्रशासनाला कोरोना विरुध्द लढाई लढण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केली.
भंडारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वितरण करण्यात येत आहे. तसेच तालुकाभर या कीटचे वितरण करण्यात येणार आहे. इतर गावातील गरीब गरजूनां किट उपलब्ध करुन देण्याचे कार्य भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. वितरण प्रसंगी धनंजय दलाल, हेमंत महाकाळकर, यशवंत सोनकुसरे, बाळा गभणे, उमेश ठाकरे, नरेंद्र झंझाड, विजय खेडीकर, भानुदास बनकर, गणेश बानेवार, गणेश चौधरी, महेंद्र बारापात्रे, सुनील मोगरे, निरंजन पाटील, अबरारभाई, दिनेश आगरे, अभय सेलोकर, पुरुषोत्तम बागडे यांच्यासह तालुका व शहर कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे देश आणि राज्यावर संकट आले आहे. या संकटकालीन परिस्थितीशी शासन व प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र अशा परिस्थितीत आपले देखील समाजाप्रती दायित्व आहे. आपण लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेलो आहे. ईच्छा असून देखील जिल्ह्यात येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत धान पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्थानी एकत्र येवून गरजूपर्यंत मदतीचा हात पोहोचावा, तसेच शासनाचे नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टन्सिंग राखत मदत द्यावी.
- प्रफुल पटेल,
खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते