रस्ता बांधकामासाठी राष्ट्रवादीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:04 PM2018-12-01T22:04:26+5:302018-12-01T22:04:50+5:30
येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद चौक-राजीव गांधी चौक-खात रोडपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद चौकातून महिनाभरापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु १५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेने महामार्ग प्रशासनाला पत्र दिले. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ काम सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. साईमंदिरापासून निघालेल्या या मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. जिल्हा कचेरीवर हा मोर्चा पोहचल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु झाले नाही तर भंडारा बंदचा इशाराही देण्यात आला.
या मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अॅड.जयंत वैरागडे, अॅड.विनयमोहन पशिने, बाबूराव बागडे, परवेज पटेल, जुगल भोंगाडे, नगरसेवक उमेश ठाकरे, नगरसेविका अश्विनी बुरडे, नगरसेवक अमर उजवणे, मधुकर चौधरी, सुनील साखरकर, शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजू हाजी सलाम, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, सेवादल जिल्हाध्यक्ष सुनील शहारे, प्राध्यापक राजपूत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र वानखेडे, सुमीत घोगरे, विजय खेडीकर, सरिता मदनकर, हर्षा वैद्य, रत्नमाला वैद्य, निलीमा गाढवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
महामार्गावर रस्ता रोको
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काही काळ आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.