रासेयो शिबिरात सहकार्य आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:27 PM2017-10-01T22:27:44+5:302017-10-01T22:28:02+5:30
गावाच्या सर्वांगीण विकास व युवकावर श्रम व संस्कार घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गावाचा सहभाग असावाच.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : गावाच्या सर्वांगीण विकास व युवकावर श्रम व संस्कार घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गावाचा सहभाग असावाच. गावाच्या सहभागाशिवाय शिबिर यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना त्रिदिवसीय शिबिराच्या समारोपीय सोहळ्यामध्ये माजी प्रादेशिक संचालक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख माधव जांभुळे व्यासपीठावरून विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
विकास हायस्कूल कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय सेवा योजना त्रिदिवसीय विभागीय शिबिरामध्ये समारोपीय सोहळा आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी जौंजाळ, विशेष अतिथी नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक सतीश मेंढे, माजी प्रादेशिक संचालक रा.से.यो. प्रमुख माधव जांभुळे, शिक्षण उपनिरीक्षक जि.प. भंडारा टिचकुले, प्राचार्य वसंतराव कारेमोरे, उद्दल आकरे उपस्थित होते. विशेष अतिथी सतीश मेंढे व्यासपीठावरून बोलताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना या शिबिरातून सक्षम युवक घडविण्याकरिता देशाला उपयोगी पडेल असे युवक निर्माण करतो.
स्वच्छता व श्रम करण्याकरिता कुठेही कमीपणा मानू नये. नैतिक मुल्य प्रत्येकांनी रूजवावे. समानतेचे बीज रोवले पाहिजे. तेव्हाच आपले जीवन समृद्ध होईल असे मोलाचे मार्गदर्शन केले. माधव जांभुळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेताना गावाच्या सहकार्यातून व शासनाच्या अल्प अनुदानातून आयोजन करावे लागले. त्यामुळे शिबिर यशस्वी होतात.
रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व विविध शिबिराचे विविध अनुभव कथन केले. अध्यक्षीय समारोपीय भाषणात डॉ.श्रीहरी जौंजाळ यांनी तुम्ही जा तुम्हाला शुभेच्छा. पण आपले उद्देश काय आहे हे मात्र विसरू नका.
समाज घडवा व आदर्श नागरिक बना असा संदेश दिला. त्रिदिवसीय शिबिरादरम्यान राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर समर्थ महाविद्यालय लाखनीचे प्राचार्य संजय पोहरकर यांनी मार्गदर्शन केले.
बौद्धिक कार्यक्रमांतर्गत ‘पोरी जरा जपून’ या विषयावर ज्येष्ठ कवियत्री प्रा.विजया मारोतकर यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. योग पतंजली संस्था भंडारा यांच्याद्वारे योगाचे धडे, प्राणायाम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय गोखले यांनी केले. संचालन विनोद मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर गिरडे यांनी केले.