मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:17+5:30
वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बोलीभाषेच्या विकासाने प्रमाणभाषा समृद्ध होत असते. मराठी भाषा ही अनेक बोलीभाषांची भाषिक कौशल्य असलेली समृद्ध भाषा होय. अलीकडच्या काळात इंग्रजीच्या अतिवापराने मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव जाणवत आहे. इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून अपरिहार्य असली तरी मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले.
वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयश्री सातोकर, कवी प्रमोद अणेराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.
मराठी भाषेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहचले आहे. अशावेळी मराठी भाषेला उतरती कळा लागली असे म्हणणे संयुक्तीक होणार नाही. मात्र जागतिक संगणकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या अतिवापराने तसेच मराठी बोलण्याच्या संकोचाने मराठीचा वापर कमी होताना दिसत आहे. दोन मराठी व्यक्ती आपसात इंग्रजी किंवा हिंदीतून संभाषण करतात, अशावेळी हा धोका अधिक संभवतो. भाषेच्या कक्षा विस्तारताना आपली भाषेची समज व ज्ञान वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे मत पाखमोडे यांनी व्यक्त केले.
भाषेचा इतिहास व संस्कृती विशद करताना प्रमोद अणेराव यांनी अनेक संदर्भ दिले. बारा मैलावर बोली बदलत असली तरी भाषा ही कायम असते. भाषेचा गोडवा प्रत्येकांनी जोपासण्याची गरज मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मार्गदर्शन केले. संचालन संजय नारनवरे यांनी केले.
संत साहित्याने मराठी समृद्ध
मराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा असून संत साहित्याने मराठीला समृद्ध करण्याचे काम पूर्वापार केले, असे प्रा.डॉ.जयश्री सातोकर यांनी सांगितले. मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा असून मराठीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले. संत साहित्यातून सुद्धा बोलीभाषेचा गोडवा आपणास पहावयास मिळतो. बोलीभाषा व व्यवहार्य भाषा वेगळ्या असल्या तरी त्याचा एकच उगम असतो. बोलीभाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे डॉ.सातोकर यांनी सांगितले.