आमदाराच्या घरासमोर लावली कडूलिंबाची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:12 PM2018-01-31T23:12:18+5:302018-01-31T23:12:39+5:30
राष्ट्रीय महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला २९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत.
आॅनलाईन लोकमत
पवनी : राष्ट्रीय महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला २९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत. प्रकल्पबाधीत ८५ गावे व १८२ शेतशिवारातील नागरिकांच्या समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी आवाज बुलंद करावा या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रहार समितीने अभिनव आंदोलन सुरु केले. दुपारी १२ वाजता आमदार रामचंद्र अवसरे यांचे घरासमोर कडुलिंबाचे रोपटे लावले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाºया राज्य शासनाच्या विरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या.
प्रकल्पग्रस्तांना आ. रामचंद्र अवसरे यांना भेटून निवेदन द्यायचे होते. परंतु आ.अवसरे भंडारा येथे गेल्याने त्यांचे बंधू सुरेश अवसरे यांनी निवेदन स्वीकारले. भेटण्यासाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त करीत शासनाच्याविरूद्ध नारेबाजी केली. धरणाची मूळ किंमत ३०२ कोटीवरून २० हजार कोटी रूपयांवर पोहचली. शासन वाढलेली किंमत मान्य करते. परंतु १४,९६८ कुटुंबांमध्ये वाढ होऊन ७४,८४० कुटुंबसंख्या झाली ते मान्य करायला शासन तयार नाही. वाढीव कुटुंबासाठी १८ आॅगस्ट २०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात १९९० पूर्वी लग्न झाले असावे ही अट टाकली आहे. ती रद्द करावी. प्रकल्पबाधितांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय व शेती सोडून बाहेर पडावे लागले. शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत व लाभाची रक्कम दैनंदिन खर्चात गेली. आता प्रकल्पग्रस्त दारिद्र्याचा सामना करीत आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एकास नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. नोकरी देता येत नसेल तर २५ लाख रुपये एकमुस्त देण्यात यावे. १८२ शेतशिवार बाधीत गावांचे स्वेच्छा पुनर्वसन करण्यात यावे. पुनर्वसन होईपर्यंत नेरला, सुरबोडी, खापरी, भुटानबोरी, रुयाळ टेकेपार, तिड्डी, निमगाव, कारधा आदी गावातील विद्युत व शासनाच्या सोयीसुविधा सुरू ठेवण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना धरणात मासेमारी करू द्यावे, प्रकल्पग्रस्तांचे नाव बीपीएल यादीत समावेश करावे. प्रकल्प ग्रस्तांच्या पाल्यांना उच्चशिक्षण मोफत देण्यात यावे, अशा मागण्या करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी बाळकृष्ण जुवार, एजाज अली, सोमेश्वर भुरे, रुपेश आथीलकर, युवराज गुरफुडे, मंगेश वंजारी, चेतन पडोळे, स्वप्नील माथुरकर, राजेश पाखमोडे उपस्थित होते.