ध्येय सिद्धीकरिता प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:29 PM2018-02-16T22:29:32+5:302018-02-16T22:29:51+5:30
आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे.
आॅनलाईन लोकमत
साकोली : आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयसिद्धीकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात स्वर्ण जयंती महोत्सव निमित्त आयोजित युवास्वर या वार्षिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. उत्फूर्त भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वत: मधील कलागुण ओळखूण त्याचा लाभ आवडीच्या स्थान प्राप्तीकरिता करून देशाचे आदर्श नागरिक व्हावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अविनाश ब्राम्हणकर रामचंद्र कोहळे, डॉ. राजेश चंदवानी, डॉ. अजय तुमसरे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ. हरेश त्रिवेदी यांनी प्रास्ताविक भाषणातून पाहुण्याचे स्वागत केले. प्रविण वाढई, विद्यार्थी सचिव यांनी उपस्थितांसमोर महाविद्यालयाचा वार्षिक अहवालाचे वाचन केले. अविनाश ब्राम्हणकर यांनी संक्षिप्त भाषणातून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या वार्षिक परंपरेनुसार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रफुल पटेल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अशोक चुटे यांची गणित व डॉ. टप्पे इंग्रजी यांची नागपुर विद्याशाखेवर निवड झाल्याप्रसंगी तसेच डॉ. सी.जे. खुने यांची एन.सी.सी.चे कॅप्टन पदावर पदोन्नती व डॉ. किशोर नागपुरे यांचे विभागीय समन्वयक एनएसएस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ पदावर राहुन महाविद्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय योगदानाबद्दल शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बेस बॉलमध्ये मोनाली धुर्वे, रंजु सोनकुसरे व बॅडमिंटनमध्ये संदीप वलथरे व स्रेहा कापगते यांची अ.भा. विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होऊन तसेच एनसीसी कॅडेट पंकज गायकवाड तसेच एनएसएस कॅडेट प्रशांत पटले यांनी मुंबई येथे आयोजित गणतंत्र परेड २०१८ येथे सहभागी झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले. आभार प्रदर्शन वार्षिकोत्सव सांस्कृतिक अधिकारी सी.जे. खुणे यांनी केले.