मालगुजारी तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:56 PM2019-04-29T21:56:54+5:302019-04-29T21:58:39+5:30
कोंढा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला मालगुजारी तलाव असून या तलावाचे पुनरूजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कोंढा येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला मालगुजारी तलाव असून या तलावाचे पुनरूजीवन करून सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. पण याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गाव अस्तीत्वात आला तेव्हापासून कोंढा गावाला लागून मोठ्या डौलाने येथील मालगुजारी तलाव आहे. या तलावात गावातील नाल्याद्वारे सांडपाणी जमा होते. तसेच तलाव खोल असल्याने येथे वर्षभर नेहमी पाणी साचून असते. ३० ते ४० वर्षापुर्वी या तलावाचे पाणी जनावरांना दिले जात होते. यासाठी नागरिक कावड, घागर, बादलीने पाणी नेत होते. किंवा जनावरे तलावावर पाणी पिण्यासाठी येत सध्या परिस्थिती बदलली आहे. पाण्याची सोय घरोघरी झाली. विहीरी बोरवेल्स झाल्याने तलावाच्या पाण्याचा वापर होत नाही. मालगुजारी तलाव असल्याने पाणी तलाव मालक शेतीसाठी नेत होते. पण ते देखिल होत नसल्याने बाराही महिने तलावात पाणी साचून राहते.
कोंढा येथील तलाव गावालगत असल्याने त्याचे खोलीकरण होणे गरजेचे आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्याचे खोलीकरण होणे आवश्यक आहे. तसेच तलावाच्या सभोवताल झाडे लावून ग्रामपंचायत व राजमुद्रा सामाजिक क्रीडा मंडळाने सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास व्यापक स्वरूप देऊन तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या सौंदर्यात वाढ होईल. यासाठी मालगुजारी तलावावर ज्यांची मालकी आहे, त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोंढा हे गाव पवनी तालुक्यात मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पर्यटनास मोठी चालना दिल्यास तलावात बोटींग सुरू करता येईल. येथे दर बुधवारला तलावाच्या शेजारी आठवडी बाजार भरतो. तसेच गाय म्हैसचा प्रसिद्ध बाजार येथे बुधवारला भरतो.
त्यासाठी विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील नागरिक म्हैस, गाय खरेदीसाठी येत असतात. तलावात नैसर्गीक सौंदर्यात वाढ करून सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. पवनी तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून गोसे प्रकल्प सिंदपुरी यास पर्यटक भेटी देत असतात. तेव्हा तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनास चालना मिळण्यास वाव आहे. तलावात नौकाविहार सुरू केल्यास हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास वेळ लागणार नाही.
तलाव कायापालट करण्याची मागणी
गावाच्या मधोमध हे तलाव असून येथे लोकांची वर्दळ दिवसभर असते. तेव्हा या मालगुजारी तलावास गावातील उमद्या तरूणांनी भाडेतत्वावर घेवून त्याचा विकास करणे गरजेचे आहे. शासन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी देत असते. कोंढा येथील तलावाच्या सौंदर्याकरणासाठी पुढाकार घेऊन या मालगुजारी तलावाचा कायापालट करण्याची मागणी कोंढा येथील निसर्गप्रेमी लोकांनी केली आहे.