पाणी शुद्धतेसाठी नागरिकांच्या पुढाकाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:32 PM2017-12-17T23:32:01+5:302017-12-17T23:33:21+5:30
नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. खतांच्या खड्ड्यांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध राहावे यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. देवरे यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, पंचायत समिती गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांच्या संयुक्त विद्यमाने लाखांदूर पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत सदस्य व पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे प्रशिक्षण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, उपसभापती तोंडरे, तालुका आरोग्य अधिकारी नैतामे, विस्तार अधिकारी मेढे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरपाम, गटसमन्वयक त्रिरत्न उके, समूह समन्वयक चेतन मेश्राम, जगदीश तºहेकर आदी उपस्थित होते.
यावेळी देवरे यांनी, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांनी नागरिकांना नियमित शुद्ध पाणी पुरवठा करणे व त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी शुद्ध राहावे यासाठी नियमित पाण्याचा निचरा होणे व स्त्रोतांभोवती घाण नसावी. पाणी साचून राहू नये यासाठी पुढाकार घेऊन तसे कृत्य करणाऱ्या नागरिकांना परावृत्त करण्याची जबाबदारी पाणी व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांची आहे. नळाला तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळावा व प्रत्येक नळजोडणीधारकांनी पाणीपट्टी कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केली.
मंगला बगमारे यांनी, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी नियमित लक्ष देवून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी विस्तार अधिकारी मेढे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. तालुका कार्यक्रम अधिकारी नैतामे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे यांनी पाणी व स्वच्छतेबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पाच गावातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण
या दोन दिवसीय प्रशिक्षणात चप्राड, सोनी, तावशी, रोहणी, जैतपूर येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या कार्यपद्धतीची माहिती, कार्यक्रमाची अंमलबजावणी, शाश्वत बांधकाम, पाणी गुणवत्ता, शुद्धीकरण, लोकसहभाग, सांडपाणी व्यवस्थापन व भूजल अधिनियमाची माहिती देण्यात आली.