अड्याळ व परिसरात लसीकरणासाठी समुपदेशनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:27+5:302021-05-07T04:37:27+5:30
अडयाळ : अड्याळ व परिसरात कुणी लस घेता का लस ! या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ...
अडयाळ : अड्याळ व परिसरात कुणी लस घेता का लस ! या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यात महत्त्वाचे म्हणजे, लसीकरणानंतर जीव जातो, ही अफवा परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात पसरल्याचे आता समोर येत आहे. आता नागरिकच लसीकरणासाठी समोर येत असून पुन्हा जोमाने समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ तथा ४५ वर्षेवरील सर्वांसाठी ग्रामीण रुग्णालय अड्याळ तथा परिसरात लसीकरणाला सुरुवात झाली खरी, पण अद्याप ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही, हेही तितकेच सत्य आहे. शासनाने जी लस आज गावखेड्यात उपलब्ध करून दिली आहे, तिचे महत्त्व किती आहे. याची जाणीव ठेऊन तात्काळ लसीकरण करावे, असेही एका बाजूला बोलल्या जात आहे.
शासन, प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभागामधील काम करणाऱ्या प्रत्येक लहान- मोठा कर्मचारी, अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता यावेळी काम करत आहेत. गावात आणि परिसरात आता लसीकरण जास्तीत जास्त ग्रामस्थांनी करून घ्यायचे झाल्यास त्यांच्या मनात असलेली भीती आधी दूर करावी लागेल किंवा त्यासाठी तसा प्रयत्नदेखील करणे आज गरजेचे झाले आहे. यासाठी आता घरोघरी जाऊन समुपदेशन करणे आवश्यक आहे. यासाठी आता शासन, प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे.
ग्रामीण रुग्णालयात ६ मे रोजी पुन्हा पहिल्याच दिवशी दुसरी बाजू पाहायला मिळाली. ती म्हणजे, १८ वर्षांवरील ग्रामस्थांनी लसीकरणासाठी केलेली गर्दी. दुपारी २ ते ५ पाच वाजेपर्यंत जवळपास ९० लसीकरण करण्यात आले. गावातील सोशल मीडियावर लसीकरणाविषयी थिंक पॉझिटिव्ह मॅसेज गेल्याने बरेच सुखावले. ग्रामस्थांनी तात्काळ लसीकरण केंद्र गाठून लसीकरण करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात येत आहे.