स्वाभिमानी भारतासाठी कृतिशीलतेची गरज

By admin | Published: May 31, 2015 12:34 AM2015-05-31T00:34:56+5:302015-05-31T00:34:56+5:30

लोक कल्याणाची भावना ठेवून ऋषिमुनी, साधूसंत, थोर पुरुष, क्रांतिकारक व समाजसुधारकांनी सुखी, स्वस्थ, समृद्ध, ...

The need for creativity for self-respecting India | स्वाभिमानी भारतासाठी कृतिशीलतेची गरज

स्वाभिमानी भारतासाठी कृतिशीलतेची गरज

Next

दीपक तामशेट्टीवार यांचे प्रतिपादन : प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप
भंडारा : लोक कल्याणाची भावना ठेवून ऋषिमुनी, साधूसंत, थोर पुरुष, क्रांतिकारक व समाजसुधारकांनी सुखी, स्वस्थ, समृद्ध, समर्थ आणि स्वाभीमानी भारताचे स्वप्न बघितले. आजपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, असा भारत खऱ्या अर्थाने साकारायचा असेल तर देशातील प्रत्येकाने कृतिशील होण्याची गरज आहे. समृद्ध भारत घडविण्यासाठी कृतिशील होऊन प्रयत्नांची पराकाष्टा करणारी पिढी घडविण्याचे काम संघ करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप शुक्रवारी येथील स्प्रिंग डेल शाळेत झाला. त्यामुळे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. २२ दिवस चाललेल्या वर्गात विदर्भ प्रांतातीतल ३६० स्वयंसेवक सहभागी झाले होते. ९ मे रोजी प्रारंभ झालेल्या वर्गाचा समारोप २९ रोजी झाला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भरत भलगट, विदर्भ प्रांत संघचालक दादाराव भडके, विभाग संघचालक भानुदास वंजारी, वर्गधिकारी पुरुषोत्तम बोकडे उपस्थित होते. सुरुवातीला प्रांत संघचालक दादाराव भडके यांनी भंडारा नगर संघचालक म्हणून अनिल मेहर यांची घोषणा केली.स्वयंसेवकांना २२ दिवसात ग्रहण केलेल्या ज्ञानाच्या भरवशावर विविध गोष्टींचे प्रात्यक्षिक वर्गाधिकारी पुरुषोत्तम बोकडे यांनी केले. त्यांनी संघाचे कार्य आणि वर्गात झालेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी भलगट यांनी संघाच्या कार्याचे कौतूक करीत संघ करीत असलेल्या कार्यामुळे हिंदू समाजाला मजबुती प्राप्त होईल असे सांगितले., संघटित शक्तीतून समर्थ राष्ट्र घडू शकते, हे संघ कर्यातून सिद्ध होते असेही ते म्हणाले.
आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्ते पुढे म्हणाले, कुण्या एके काळी राजा, राजाश्रय नसतानाही माणसे सुख, समाधानाने जगायची, दंड आणि दंड देणारेही तेव्हा नव्हते. तरीही सर्वकाही सुरळीत होते. याचे कारण प्रत्येक जण धर्माने जगायचा. धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्याची जाणीव ठेवून त्याच्या पूर्तीसाठी त्यांची धडपड असे. केवळ स्वत:साठीच न जगता दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती माणसाला सुखी, समाधानी बनवित होती. असा कृतज्ञतेचा भाव ठेवून आज जीवन जगले गेले तर नक्कीच पूर्वजांनी पाहिलेल्या समृद्ध राष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकेल.
आमच्या पूर्वजांनी जी स्वप्ने बघितली ते पूर्ण करण्याचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाला कृतीशील होऊन कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. संघ अशीच पिढी घडविण्याचे काम गत अनेक वर्षांपासून करीत आहे. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक समृद्ध आणि स्वाभिमानी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडत असताना प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The need for creativity for self-respecting India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.