कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या पुढाकाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:35 AM2021-05-10T04:35:54+5:302021-05-10T04:35:54+5:30
वाकेश्वर : कोरोनाचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. लोक काळजीने बेहाल झाले आहेत. संचारबंदीने घराबाहेर निघणे कठीण झाले ...
वाकेश्वर : कोरोनाचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. लोक काळजीने बेहाल झाले आहेत. संचारबंदीने घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मात्र वाढलेल्या कोरोनामुळे नागरिकांना त्रिसूत्रीचा वापर करून स्वतःला कोरोनापासून दूर ठेवता येईल. यासाठी घरातून निघताना डबल मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टंसिंग, घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपण स्वतःला व परिवाराला कोरोनापासून दूर ठेवू शकतो.
मात्र यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुण काही प्रमाणात अजूनही बिनधास्त वावरतांना दिसतात. कोरोनाने रौद्र रूप धारण केले असतानाही ग्रामीण व शहरी सगळ्यात भागांमध्ये कोरोना पसरलेला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक अजूनही कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसींविषयी शासंक आहेत. शासन-प्रशासन, नेते, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ मंडळी व डॉक्टर्स लसीचे आवाहन करत आहेत. पण ग्रामीण लोकांमध्ये लसीच्या बाबतीत अजूनही भीतीची मानसिकता पसरली आहे. लस घेतल्यानंतर काही लोकांना ताप येणे ही साधारण बाब आहे. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. अजूनही काही लोकांमध्ये गैरसमज आहे. तो दूर होणे गरजेचे झालेले आहे. भंडारा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागातील वाढले आहे. प्रत्येकाने सकाळी एक तास अत्यंत प्रामाणिकपणे योग व प्राणायाम केलेत तर शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी होणार नाही. आपण तंदुरुस्त राहू. सकारात्मक विचार आता गरज बनली आहे. अनेकांच्या मनात विचारांची घालमेल होत आहे. अत्यंत तटस्थपणे व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून परिस्थितीचा स्वीकार करा. जास्त अनावश्वक विचार करण्याची गरज नाही. स्वतःला जपणे व कोरोनापासून मुक्त ठेवणे आज आवश्यक झाले आहे.
मानवी शरीरात कोरोना जंतूंचा प्रवेश नाक, तोंडावाटे होत असतो. त्यामुळे डबल मास्क हा त्यावर एक उत्तम पर्याय आहे. मास्क इज मेडिसिन ही संकल्पना आता रूढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच मास्कचा वापर औषधाप्रमाणेच करायला हवा. तरच आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकतो. यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा.