स्वतंत्र विदर्भ राज्य काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:56 PM2018-05-04T22:56:21+5:302018-05-04T22:56:33+5:30
स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
विराच्या भंडारा जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बार अशोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कैलास भुरे होते. अतिथी म्हणून विराचे कार्याध्यक्ष अॅड. निरज खांदेवाले, भंडाराचे जिल्हाध्यक्ष अॅड. पद्माकर टेंभुर्णीकर, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, अक्षय पांडे, गुरमित चावला आदी उपस्थित होते.
अॅड. टेंभुर्णीकर म्हणाले, विदर्भ स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी विराचे योगदान व भरारी महत्वाची आहे. या आंदोलनात अन्य क्षेत्रातील मंडळीसोबतच वकीलांचाही सहभाग असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मागणीसाठी जनआंदोलनाला निश्चित दिशा प्राप्त झाली आहे. जिल्हा कार्यालयाच्या स्थापनेमुळे कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा प्राप्त होणार आहे.
यावेळी उपस्थित अतिथींनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शासन केवळ घोषणाबाजी करीत आहे. अच्छे दिनाचा लॉलीपॉप जनतेला दाखविला जात आहे. पेट्रोलचे दर ६० रुपयांवरुन ८० रुपये झाले आहे. गॅस सिलिंडरचे दर ही सातत्याने वाढत आहेत. कैलास भुरे म्हणाले, तथागत गौतमबुध्दाच्या जयंतीदिनी विराच्या कार्यालयाचे उद्घाटन होणे ही निश्चितच यशस्वीकडे वाटचाल करण्याची चिन्हे आहेत. यावेळी छैलबिहारी अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला लाखांदूरचे तालुका अध्यक्ष दिगांबर मेश्राम, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य दुर्वास धार्मिक, संजय मते, सुका देशकर, यादव चौबे, शेख इब्राहिम, अजय मेश्राम, कैलास टेंभुर्णे, परिका रामटेके, योगेश्वरी कोचे, ज्वाला कोचे, उन्नती कटकवार, दामिनी चुधरी आदी उपस्थित होते. संचालन व आभार महिला आघाडीच्या संघटन सचिव परिका रामटेके यांनी केले.