बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज
By Admin | Published: February 2, 2016 01:03 AM2016-02-02T01:03:23+5:302016-02-02T01:03:23+5:30
गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
पवनीत जनजागृती कार्यक्रम : यु.व्ही. जोशी यांचे प्रतिपादन
पवनी : गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजात मुलगा, मुलगी असे भेदभाव व्हायला नको. सर्वांना समानतेची वागणूक घ्यावी. तसेच एकही मुल शाळाबाह्य राहू नये त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शिक्षण मिळाले नाही तर गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु होते. म्हणून बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन क स्तर दिवाणी न्यायाधीश यु.व्ही. जोशी यांनी केले.
उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये बाल न्यायालय अधिनियमानुसार गठीत बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याबाबत जनजागृतीकरिता पोलीस स्टेशनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना न्यायाधीश जोशी यांनी बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी सहाय्यक दिवाणी न्यायाधीश एस.एम. सय्यद, गटशिक्षणाधिकारी बी.वाय. निमसरकार, पोलीस निरीक्षक मधुकर गीते, अॅड. एस.एम. भुरे, वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.एल.के. देशमुख, पदविधर शिक्षक रविंद्र रायपुरकर व मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी बालगुन्हेगारी वाढण्याचे कारण व ते थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी माध्यमिक, पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पोलीस पाटील,शिक्षक व कर्मचा-यांसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अॅड.एस.एम. भुरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)