पर्यटन महामंडळ व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Published: November 27, 2015 12:52 AM2015-11-27T00:52:29+5:302015-11-27T00:52:29+5:30
तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कारच म्हणावा लागेल निसर्गाची ही किमया पाहून माथेरान व महाबळेश्वराची निश्चितच आठवण होते.
जिल्ह्याचा स्वर्ग : तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा
मोहन भोयर तुमसर
तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कारच म्हणावा लागेल निसर्गाची ही किमया पाहून माथेरान व महाबळेश्वराची निश्चितच आठवण होते. निसर्गाच्या या खाणीकडे मात्र लोकप्रतिनिधी पर्यटन विकास महामंडळ तथा संबंधित अधिका-यांचे येथे दुर्लक्ष होत आहे. भंडारा जिल्हयाचा हा स्वर्ग मात्र दुर्लक्षी आहे.
तुमसर-कटंगी या आंतरराज्यीय महामार्गावरील तुमसर नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्र आहे. जंगल घनदाट असून राखीव जंगल आहे. तुमसरवरुन नाकाडोंगरी व लेंडेझरीकडे जातांनी रस्त्याच्या कडेला दाटीवाटीने ऊंच वृक्ष आहेत. जंगल घनदाट असल्याने तथा जवळच टेकड्या असल्याने माथेरान व महाबळेश्वरची येथे आठवण निश्चित येते. निसर्गाने येथे भरभरुन दिले आहे. सुमारे ४० किमी परिसरात जंगल आहे. या जंगलात २३९ वनोऔषधांची झाडे आहेत. मौल्यवान वृक्षांचा येथे खजिना आहे. या जंगलातून मध्यप्रदेशाकडे डामरी रस्ता जातो तर दुसरा रस्ता लेंडेझरी मार्गे रामटेककडे देशाची टायगर राजधानी पेंचकडे जातो. संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगानी घेरला आहे.
उत्कट, अद्वितीय, अवर्णनीय तथा निसर्गरम्य या परिसराने ब्रिटीशांनाही वेड लावले होते. तुमसर-कटंगी हा आंतरराज्यीय महामार्ग त्यांनीच बांधला होता. त्यावेळी तो कच्चा रस्ता होता. बावनथडी व वैनगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यामुळे हा परिसर सदैव हिरवागार राहाते, बावनथडी धरणातील पाणीसाठयामुळे अनेक प्राणी येथ्ज्ञील जंगलात वास्तव्याला आहेत. यात बिबट्या, हरिण, रानकुत्रे, सांबर, ससे, रानकोंबड्या, रानडुकर इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. विविध प्रजातीचे साप येथील जंगलात आहेत.
वनविभागाने तुमसर वनविभागाचे पुन्हा दोन भाग पाडले यात नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपिरक्षेत्राचा समावेश आहे. जंगलाचे व जंगलातील प्राण्यांचे संरक्षणाकरिता वनविभागाने येथे पाऊल उचलले. पर्यटन विकास महामंडळाचे येथे कायम दुर्लक्ष आहे. पर्यटनाच्या नानाविध संधी येथे उपलब्ध आहेत. पंरतु लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्याचे कायम दुर्लक्ष आहे.
जंगलात पाण्याचे येथे नैसगिक स्त्रोत आहेत. कृत्रिम स्त्रोत नाही. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. मध्यप्रदेशाच्या सीमा भीडल्या असल्याने वनतस्करांची नजर या जंगलावर नेहमीच राहते. पंरतु कायमस्वरुपी योजना येथे नाही. बावनथडी नदीपात्र विर्स्तीण असल्याने या मार्गाने तस्करी होते. मौल्यवान वृक्ष मॅग्नीजचा भूगर्भात मोठा साठा हा या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. किर्र जंगल सायंकाळी या मार्गावर तुरळक वाहन धावत असल्याने निश्चीतच भिती वाटते. पक्ष्यांच्या किलबिलाट यामुळे आसमंत व जंगलावर आमचे राज्य आहे. असे दृष्य येथे खुणावते. या जिल्हयातील स्वर्गाकडे मात्र दुर्दवाने शासकीय यंत्रणेचे लक्ष गेले नाही.
दरवर्षी जिल्हयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त होतो. पंरतु त्या निधीतून मात्र या स्वर्गरुपी जंगलाला काहीच प्राप्त झाले नाही. तरी जंगलाच्या नैसर्गिक रुपात काहीच कमी दिसत नाही.