माडगी पर्यटनस्थळाची शासनदरबारी उपेक्षा
By admin | Published: November 21, 2015 12:37 AM2015-11-21T00:37:22+5:302015-11-21T00:37:22+5:30
विदर्भाची पंढरी व मिनी कन्याकुमारी म्हणून प्रसिद्ध माडगी पर्यटनस्थळ शासनदरबारी उपेक्षित आहे.
तुमसर : विदर्भाची पंढरी व मिनी कन्याकुमारी म्हणून प्रसिद्ध माडगी पर्यटनस्थळ शासनदरबारी उपेक्षित आहे. चांदपूर देवस्थान व परिसराला राज्य व केंद्र शासनाने विकासाठी निधी दिला. परंतु, माडगीला एक छदामही न दिल्याने भक्तांसोबतच परिसरातील नागरीकांत प्रचंड असंतोष धुमसत आहे.
बारमाही वाहणारी वैनगंगा नदीपात्राच्या मध्यभागी २०० फूट शिळेवर भगवान नृसिंह व वीरसिंहाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्राचीन आख्यायिका येथे विदित आहे. कार्तिक एकादशीला १५ दिवसांची यात्रा मागील १०० वषार्पासून भरत असल्याचा इतिहास आहे. राज्य शासनाने मंदिर परिसराच्या विकासाकरिता २०१२ मध्ये केवळ ३ लक्ष देण्याची घोषणा केली होती. तुमसर-भंडारा राज्य महामार्ग व मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थळ आहे. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. चांदपूर मंदिर व परिसर पर्यटनाकरिता केंद्र व राज्य शासनाने विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. तेव्हा माडगी तीर्थस्थळ व पर्यटनस्थळाला सुध्दा निधी मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु येथे भ्रमनिरास झाला. नदीच्या मध्यभागी हे स्थळ असल्याने हे स्थळ सर्वांना आकर्षित करते. एमटीडीसीने बोटिंगची व्यवस्था केली तर स्थानिकांना रोजगारसुद्धा प्राप्त होऊ शकते. या स्थळाला भगवान राम, लक्ष्मण, सीता, वनवासात असताना काही काळ या शिळेवर घालविले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराला समर्थ रामदास, तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, विनोबा भावे यांनी भेट दिली आहे. मुंबई - हावडा मार्गावरील रेल्वे पुल तयार करतांना इंग्रज अधिकाऱ्यांनासुध्दा या स्थळाने भुरळ घातली होती. या मंदिरात संत अण्णाजी महाराजांनी सुमारे ३० वर्षे वास्तव करुन समाजप्रबोधन करुन नवीन पिढीचा पाया घालून दिला. शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी पर्यटन प्रेमींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)