पुतण्याने केला काकाचा खून; बेशुद्ध असताना झाडावरून पडल्याचे सांगत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 10:58 AM2022-12-06T10:58:55+5:302022-12-06T10:59:31+5:30
सालईची घटना : काठीने डोक्यावर प्रहार, आरोपीला अटक
साकोली (भंडारा) : शेतीच्या वादात पुतण्याने काकाचा खून करण्याची घटना तालुक्यातील सालई खुर्द येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली. पुतण्याने काठीने जबर प्रहार केल्याने काका गंभीर जखमी झाला. मात्र काका झाडावरून पडल्याचा बनाव केला. दरम्यान रविवारी नागपूर येथे उपचार दरम्यान काकाचा मृत्यू झाल्यानंतर साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून पुतण्याला अटक केली. मारहणीची घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली हाेती.
कैलाश श्रीराम वासनिक (५०) रा. सालई ता. तुमसर असे मृत काकाचे नाव आहे. तर आनंद नागेश्वर वासनिक (३४) रा. सालई असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. सालई येथील कैलास वासनिक आणि आनंद वासनिक प्रत्येकी एक एकर शेती आहे. कैलासची एकर शेती ठेक्याने आनंदने घेतली होती. ठेक्याची तीन हजार रुपयाची रक्कम आनंदने काका कैलासला दिली होती. मात्र काका वारंवार आनंदला माझी शेती यापुढे करायची नाही असे म्हणत शिवीगाळ करायचा.
सुरुवातीला आनंदने काकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र १९ नोव्हेंबर रोजी शेतात काका कैलासने शिवीगाळ केली. कैलास हातात काठी घेऊन आनंदला मारायला धावला. मात्र तिच काठी आनंदने हिसकून प्रतिकार करीत काठीने प्रहार केला. यात कैलासच्या डोक्यावर जबर मार लागला. नवेगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर साकोली येथील खासगी रुग्णालयात उपचार करून नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
नागपुरात झाला मृत्यू, गुन्हा दाखल
काका कैलास झाडावरून पडल्याचे कारण सांगून आनंदने उपचार केला. याविषयी पोलिसांनाही कळविण्यात आले नव्हते. गंभीर जखमी काकाची तब्येत बिघडत तो बेशुद्ध झाला. त्यावरून २४ नोव्हेंबर रोजी कैलाशची पत्नी जयमाला वासनिक हिने साकोली ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी आनंद वासनिक विरोधात भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान रविवारी कैलाश वासनिक यांचा नागपूर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुतण्या आनंद नागेश्वर वासनिक याला अटक केली. सोमवारी न्यायालयाने आनंदला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले हवालदार चांदेवार, गुरव करीत आहेत.