नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2016 12:18 AM2016-08-17T00:18:23+5:302016-08-17T00:18:23+5:30
ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. अड्याळ व परिसरातील हजारो शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाविषयी मोठी आशा आहे.
शेतकरी मेटाकुटीस : अड्याळ व परिसरातील शेतकऱ्यांची दैनावस्था
विशाल रणदिवे अड्याळ
ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. अड्याळ व परिसरातील हजारो शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाविषयी मोठी आशा आहे. मात्र, महत्वाकांक्षी नेरला उपसाचे काम अजूनही थंडबस्त्यात असल्साने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
काही शेतकऱ्याच्या क्षणाला लागणारा एक पाणी नाही मिळाला म्हणून हातचे पीक गेले. तर कधी पाण्याअभावी दुबार तिबार पेरणीचे संकट ओढावले आणि मागील काळात तर पाण्याअभावी रोवणीसुद्धा आली नाही. तरी पण येथील शेतकरी राजाने शेती कसणे बंद नाही केले. म्हणतात ना घरीच अळ अन् पाण्याचा लळ हा म्हणजे नेरला उपसा सिंचन आहे. हा सिंचन प्रकल्प जुलै २०१६ ला सुरु होणार असे आश्वासन आमदार रामचंद्र अवसरे व कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी दिले होते. परंतु आजही या सिंचनाचे कामे अर्धेअधिक अपुर्णावस्थेत असताना सिंचन सुरु होणार तरी कसे आणि आलेच तर किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल हाही एक प्रश्नच आहे. सध्या हे सिंचन सुरु होणार असल्याची विश्वसनीय माहिती कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी दिली आहे. परंतु कोणत्या दिवशी होणार हेही सांगितले नाही. नेरला उपसा सिंचन म्हणजे अड्याळ व परिसरातील शेकडो एकरासाठी हरितक्रांती घेवून येणारा आहे.
हा प्रोजेक्ट एकूण १,२७६ कोटी रुपयाचा असून आतापर्यंत यावर शासनाने ५०८ कोटी रुपये खर्च केले आहे. मेन वितरण नलीका ही ४३.८०० किलोमिटर एवढी असून आठ किलोमिटरपर्यंत याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे माहितीनुसार ५००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकत होती. परंतु शाखा कालवे हे अपुर्णावस्थेत असल्यामुळे केवळ ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
या नेरला लिफ्ट एरिगेशनमध्ये एकूण १२ पंप आहेत. त्यापैकी तीन पंप सुरु करण्यात येणार आहेत. या सिंचनाचे काम पूर्ण व्हायला अजून बराच कालावधी लागणार यात काही शंका नाही. जेव्हा हा पूर्ण होणार तेव्हा याचा लाभ एकुण ११६ गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यात पवनी ३८, लाखांदूर १०, लाखनी ६५ व भंडारा तीन अशा चार तालुक्यातील ११६ गावातील २१,७२७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
नेरला उपसा सिंचन १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी सुरु होणार म्हणून कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी सांगितले होते.
या नेरला उपसा सिंचनाची माहिती जेव्हा नागपुरचे मुख्य अभियंता यांना विचारली असता त्यांनी १२ पंपापैकी तीन पंपची टेस्टींग होणार असल्याची माहिती दिली. नेरला उपसा सिंचन हे लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती नाही. उद्घाटन झाल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होणार हे नक्की. जुलै महिन्यात प्रकल्प सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. मात्र, अद्याप त्याला विलंब लागेल असेच दिसून येते.
- रामचंद्र अवसरे, आमदार भंडारा
आमदार अवसरे व कार्यकारी अभियंता मेंढे यांनी जुलै महिन्यात हा सिंचन प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. येथील कामे अपूर्ण आहेत. नहर, शाखा कालवे, रोड क्रॉसिंग नहरांची अपुर्ण कामे, असतानाही पाणी देऊ म्हणून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. कम्पलीशन सर्टीफिकेट देता येत नाही व सी.सी. नसेल तर कंत्राटदाराचे देयक काढता येत नाही.
-विलासराव श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री
या सिंचनामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार. संपूर्ण शेतकऱ्यांना आता होणार नसले तरी त्यातील काहींना होणार यात शंका नाही. हे सर्व शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. यामुळे येथील व परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा खरीप हंगामासाठी नक्कीच लाभ होणार.
- एच.बी. मेंढे, कार्यकारी अभियंता