नेरला उपसा सिंचन प्रकल्पावर धडकले ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:42 PM2018-10-11T21:42:45+5:302018-10-11T21:43:19+5:30
नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही. पुनर्वसन आधी करावे नंतरच पाण्याची साठवणूक करावी, अशी मुख्य मागणी करीत दोन दिवसांनी परत एकदा नेरला वासीयांनी उपसा सिंचन प्रकल्पावर धडक मोर्चा नेला.
दोन दिवसाआधी नेरला ग्रामस्थांनी उपसा सिंचन प्रकल्पाला कुलूप ठोकले होते. त्यामुळे पंपगृह बंद आणि येथील सुरु असलेले कामकाजही बंद पडले होते. यात सहायक अभियंता अमोल वैद्य यांनी कुलूप तोडले, अशी माहिती ग्रामस्थांना मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा या प्रकल्पावर धडक मोर्चा काढला. आमदार रामचंद्र अवसरे यांना याविषयी काहीच माहिती नसल्याचे शेकडो ग्रामस्थांसमोर मान्य केले. तसेच गावहितासंबधात दोन शब्द बोलून आल्यापावली परतले. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. यावेळी कार्यकारी अभियंता मेंढे, तहसीलदार सिध्दार्थ मेंढे, हेमंत कांबळे, एम. डी. वराडे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रभाकर तिक्कस, सुरेश ढोबळे, हरिदास पाल, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.