भंडारात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकडे होतेय दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:18+5:302021-01-25T04:36:18+5:30
भंडारा : शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत नगरपरिषद आणि पशुसंवर्धन विभागाकडून टोलवाटोलवी होत असल्याने ...
भंडारा : शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत नगरपरिषद आणि पशुसंवर्धन विभागाकडून टोलवाटोलवी होत असल्याने कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे काम आमचे नाही, असे सांगून दोन्ही विभाग हात झटकत असल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम राहत आहे.
भंडारा शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. इतर शहरात लाखो रुपये खर्च मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीवर करण्यात येतो. परंतु, भंडारा शहरात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी कुत्रे पकडण्याची मोहीम भंडारात राबविण्यात आली होती. आता पुन्हा शहरातील कुत्रे पकडून ते शहराच्या हद्दीबाहेर सोडण्याच्या अनुषंगाने नगरपालिका स्तरावरून हालचाली सुरू आहेत. परंतु, कुत्र्यांच्या नसबंदीसंदर्भात नगरपरिषद किंवा पशुसंवर्धन विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपायययोजना केल्या जात नाहीत.
विशेष यंत्रणा नाहीच
शहरातील बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेकडे विशेष यंत्रणा किंवा काही कर्मचारी ठरवून दिलेले नाहीत. पूर्वी कुत्र्यांना मारता येत होते. मात्र, आता कुत्र्यांना मारू नये, असे आदेश असल्याने नगरपरिषद कुत्र्यांना मारू शकत नाही. परिणामी, कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. हेच कारण आहे की, शहरातील प्रत्येक भागात आता बेवारस कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत.
२-४ तक्रारी रोजच्याच
बेवारस कुत्रे नागरिकांच्या मागे धावतात, ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. असे झाल्यास कित्येक जण त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही मोजकेच नगरपरिषदेकडे तक्रार देतात. यामुळे रोजच्या २-४ तक्रारी येत असल्याचे नगरपरिषदेतून कळले. मात्र, कुत्र्यांना मारता येत नसल्याने त्यांचेही हात बांधलेले आहेत.
———————————————-
बेवारस कुत्र्यांबाबत तक्रारी येत आहेत. कुत्रे पकडण्यासाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. हा विषय आता स्वच्छता विभागाकडून नगरपरिषदेच्या सभेत मांडला जाणार आहे. सभेत काय निर्णय घेतला जातो, त्यानुसार पुढे काय ते ठरवता येईल. पशुसंवर्धन विभागाने सहकार्य केले तर दोन्ही विभाग मिळून कुत्र्यांच्या नसबंदीची अंमलबजावणी करता येऊ शकते.
- विनोद जाधव, मुख्याधिकारी, भंडारा.