नवोदय विद्यालयासाठी नवीन ईमारतीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:48 PM2018-07-16T23:48:25+5:302018-07-16T23:48:44+5:30
अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.
तहसीलदार संजय पवार व विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. अंबोरे यांनी नवोदय विद्यालयासाठी इमारत बघण्याचे कार्य केले असून ते लवकरच पूर्णत्वास नेऊन विद्यालय स्थानांतरीत करण्यात येईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. विशेष म्हणजे १ जुलै २०१८ पासून नवोदय विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. इयत्ता सहावीचे ४० तर इयत्ता सातवीचे ४० विद्यार्थी या विद्यालयात ज्ञानार्जन करीत आहेत. जकातदार विद्यालय परिसरात असलेल्या ईमारतीमध्ये सुरू आहे. परंतु सदर ईमारत जीर्ण झाली असून ती ईमारत खाली करावी, असा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने काढला होता. विद्यार्थ्यांची सोय कुठे करावी, असा प्रश्न प्राचार्य व पालकांसमक्ष उभा झाला. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर प्रशासनाने नवीन जागेचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. मात्र आठवड्याभराचा कालावधी लोटूनही ईमारत उपलब्ध न झाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच मुलांना बसवू, असा इशारा दिला होता. सोमवारी माजी खासदार नाना पटोले यांनी नवोदय विद्यालयाला भेट देत पालकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी जि.प.चे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, तहसीलदार संजय पवार, प्राचार्य अंबोरे यांच्यासह पालक उपस्थित होते. जिल्हा अल्पसंख्यक विभागांतर्गत येणारी एक ईमारत व अन्य एका ईमारतीबाबत चर्चा सुरू असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी पालकांना सांगितले.
गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक नाहीत
नवोदय विद्यालय सुरू होवून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मागील सहा महिन्यांपासून गणित विषयाचे शिक्षक रजेवर असल्याने नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अशीच स्थिती विज्ञान विषयाच्या शिक्षकांबाबत आहे. दोन्ही विषय महत्वपूर्ण असल्याने शिक्षकांनी पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणीही पालकांनी रेटून धरली. विशेष म्हणजे नवोदय विद्यालयाच्या गंभीर प्रश्नाबाबत उपविभागीय अधिकाºयांनी दिलेले उत्तर निराशाजनक असल्याचेही पालकांनी यावेळी चक्क बोलून दाखविले.