गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे, काेराेना महामारीने वाढविली जिल्हा पाेलिसांची डाेकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:13+5:302021-06-19T04:24:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारीने अनेकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले. याच काळात गुन्हेगारीचा आलेख थोडाफार कमी झाला. वर्षभराच्या आकडेवारीवर नजर घातल्यास गुन्हेगारीत नवीन चेहरेही दाखल झाल्याचे लक्षात येते. यावर जिल्हा पोलीस प्रशासन सजगपणे कार्य करीत असले तरी यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांची मात्र प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढ-उतार असा आहे. २०२० मध्ये एकूण तीन हजार ३९७ गुन्ह्यांची, तर २०१९ मध्ये एकूण ३५८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, विश्वासघात, गैर कायद्याची मंडळी जमविणे, अपघाती मृत्यू, जुगार, तसेच प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात काही प्रकरणात नवीन चेहरे आले आहेत. यात नवीन शोध लावण्यात पोलीस प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागली. दरोडा, चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांचा कसब लागतो.
गुन्हेगारीत शिरताहेत नवीन चेहरे
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीचा ग्राफ कमी आहे. कोरोनाकाळात गुन्हेगारीत नवे चेहरे आले आहेत. त्यांचा रेकॉर्ड व तपशील ठेवण्यात पोलिसांना मेहनतही करावी लागत असते, तसेच गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलीस प्रशासनाची चिंताही बळावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित केली जात असते.
कुठेही घटना घडल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येत असते. नागरिकही सजग झाले असून याबाबत माहिती देत असतात. पोलिसांना सहकार्य करण्यामागची भूमिका वाढल्यानेच तपासाची ही गती वाढत आहेत. पोलीस दल अधिक कर्तव्यदक्ष बनविण्यावर आम्ही भर देत आहोत.
- वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा
कोरोना महामारीने अनेकांची मन:स्थिती बिघडविली. अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. त्याचाही मानसिक आघात अनेकांना बसल्याचे जाणवते. अशावेळी त्यांना समुपदेशनासह आर्थिक व सामाजिक मदतीची नितांत गरज असते. त्यावर खऱ्या अर्थाने अशांना मदत झाली पाहिजे.
-डॉ. रत्नाकर बांडेबुचे,
मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा.
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
जिल्ह्यातील क्राईम आलेख बघता पोलिसांना खबऱ्यांची मोठी मदत होत असते. मात्र, आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार, असे सूतोवाच पोलीस प्रशासनापुढे आहे. त्यामुळे यंत्रणा प्रभावी होऊ शकेल.