भंडाऱ्यात आढळली ‘सुरण’ची नवी प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:22 AM2017-07-24T00:22:18+5:302017-07-24T00:22:18+5:30

वनसंपदा व जैवविविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक नवीन संशोधन समोर आले आहे.

A new species of 'Suran' found in the store | भंडाऱ्यात आढळली ‘सुरण’ची नवी प्रजाती

भंडाऱ्यात आढळली ‘सुरण’ची नवी प्रजाती

googlenewsNext

तरूणतुर्क संशोधकांची कामगिरी : आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत स्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनसंपदा व जैवविविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक नवीन संशोधन समोर आले आहे. तरूणतुर्क संशोधकांनी यावेळी सुरणच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असून ती वनस्पती नव्याने अस्त्तिवात आलेल्या कोका अभयारण्य आढळली आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा वनसंपदा व जैवविविधतेच्या बाबतीत समृद्धतेने नटलेला भूभाग. यात कोका अभयारण्य म्हणजे वन्यजीव वास्तव्य आणि आुर्यवैदिक औषधींची खाण आहे. कोका अभयारण्यात भ्रमंती करीत संशोधक तथा अभ्यासक डॉ. जगन्नाथ गडपायले, प्रा. सुभाष सोमकुवर आणि डॉ. अलका चतुवेर्दी या वनस्पती शास्त्रज्ञांनी ‘सुरण’ जातीच्या वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. विशेष म्हणजे त्याला जागतिक वनस्पतीतज्ज्ञांनीही मान्यता दिली आहे. प्राध्यापकांच्या या संशोधनामुळे? पूर्व विदर्भाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
सुरण या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावणारे डॉ. जगन्नाथ गडपायले हे तुमसर येथील एस. एन. मोर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. सुभाष सोमकुवर हे नागपुरातील दीक्षाभूमीतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात तर डॉ. अलका चतुवेर्दी ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत.
या संशोधक प्राध्यापकांनी सुरण वनस्पतीचा नमुना गोळा केले. तिच्या विविध भागांचे सूक्ष्म वर्णन, बाह्य अंगाचे, पृष्ठभाग, फुले, बिया व कंदमूळ आदी भागांचे २०१२ ते २०१६ या चार वर्षांत सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास केला. निरिक्षणाअंती ‘इंटरनॅशनल कोड आॅफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर’नुसार वनस्पती शास्त्रीय वर्णन करून ‘‘अ‍ॅमारफोफॉलस श्यामसलिलीयनम गडपायले, सोमकुवर व चतुवेर्दी’’, असे नामकरण केले. आहे. ‘अरेशी’ या कुटुंबामध्ये या प्रजातीचे कूळ आहे.
सन २०१२ मध्ये भंडारा तालुक्यातील पलाडी या गावानजीकच्या कोका अभयारण्यातील जंगल भागात डॉ. गडपायले व प्रा. सोमकुवर यांना या वनस्पतीचे वास्तव्य आढळले होते. अभयारण्याच्या या भागात वाघ, बिबट व इतर वन्यजीव प्राण्यांचेसुद्धा वास्तव्य आहे. अभ्यास करताना सौदी अरेबिया येथील किंग साउड विद्यापीठ रियोध येथील प्रख्यात वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एम. शिवदासन, फिनलॅण्ड येथील हर्ब्यारिअम कुरेटर युनिव्हर्सिटी आॅफ तुर्क, एस. एन. मोर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. मसराम व नागपुरातील डॉ. आंबेडकर इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. सुधीर फुलझेले यांचे त्यांना पूर्णपणे सहकार्य लाभले.
संशोधनाबाबत गोंदिया शिक्षण संस्थेचे राजेंद्र जैन, प्राचार्य डॉ. सी. बी. मसराम, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. सुधीर फुलझेले यांनी संशोधकांचे कौतुक केले आहे.

प्राध्यापकांच्या नावावर वनस्पतीचे नाव
वनस्पतीच्या नामकरणाच्या निकषानुसार या वनस्पतीला भंडारा येथील जे. एम. पटेल कॉलेजचे प्रा. श्याम डफरे व प्रा. सलील बोरकर यांना या वनस्पतीचे नाव समर्पित करण्यात आले आहे. सुरण वनस्पतीच्या नव्या प्रजातीच्या संशोधन कायार्चा शोधप्रबंध डॉ. गडपायले यांनी २०१५ मध्ये केरळमधील कालिकत विद्यापीठाच्या पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला. हा शोधप्रबंध आॅकलॅण्ड, न्युझीलंड, मॅगनोलिया प्रकाशनाच्या फायटोटेक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. सुरण वनस्पतीचा अभ्यास करणारे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ श्यामुलीन लेहटोनन यांनीही या नव्या प्रजातीला मान्यता दिली आहे. सदर नमुना बॉटनीकल सर्व्हे आॅफ इंडिया, कोलकाता येथे पाठविण्यात आले आहे.

वनस्पतीची वैशिष्ट्ये
सुरण वनस्पतीच्या मुळांपेक्षा या नवीन प्रजातीची सहमुळे वेगळी आहेत. देठावरील खुणा, तसेच फुलाच्या कोंबावरील तुराही वेगळा आहे. वनस्पतीशास्त्रानुसार रायझोमॅट्स आॅफसेट, स्टॅमिनोडल फ्लॉवर्स, प्रोट्रुडिंग डार्क पर्पलीश टू ब्रॉउशनीश अपेंडिक्स (जांभळी ते तपकीरी रंगाची अपेंडिक्स) अश आहे. सदर नवीन प्रजाती खाण्या योग्य आहे की नाही, याबाबतही भविष्यात संशोधन केले जाणार आहे.

Web Title: A new species of 'Suran' found in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.