सामान्य रूग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 01:32 AM2015-12-30T01:32:34+5:302015-12-30T01:32:34+5:30
दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली.
भंडारा येथील घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी
भंडारा : दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याबाबत मृत बाळाचे वडील देवानंद राजहंस लोणारे रा.दिघोरी (मोठी) यांनी आरोग्य उपसंचालकांसह संबंधितांकडे तक्रार करून दोषींविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दि. २५ डिसेंबरला देवानंद लोणारे यांची पत्नी निलीमा यांना प्रसूतीकरिता भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी १० वाजता भरती करण्यात आले. जननी सुरक्षा योजनेंतर्गत दिघोरी ते भंडारा पर्यंत वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी ४.१५ च्या सुमारास नीलिमा यांनी बाळाला जन्म दिला. जन्माच्या वेळी बाळाचे वजन ३.५ किलोग्रॅम होते.
बाळ जन्मल्यानंतर निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दि. २७ ला सायंकाळी ७ वाजताच्यादरम्यान बाळाची तब्येत बिघडली. त्यावेळी वॉर्ड नं. ११ मध्ये कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगण्यात आले. यावेळी बाळाला आपातकालीन विभागामध्ये घेऊन जाण्याची सूचना देण्यात आली. परंतु बालरोगतज्ज्ञाला बोलाविण्यात आले नाही.
सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपातकालीन विभागामध्ये बाळाला घेऊन गेले असता यावेळी डॉ.सुयोग कांबळे यांनी बाळाला न तपासता, बाळ चांगला आहे, तंदुरुस्त आहे असे सांगितले. परंतु यावेळी बाळ जोरजोराने रडत होता व झटके देत होता. रात्री १२ वाजता पुन्हा परिचारिकेला सांगितले असता त्यावेळीही बालरोग तज्ज्ञांना बोलाविण्यात आले नाही. २८ डिसेंबरला पहाटे ५ वाजता आपातकालीन विभागात बाळाला नेण्यात आले. आयसीयुमध्ये भरती करण्यात आले. परंतु बाळावर कोणत्याच प्रकारचे उपचार करण्यात आले नाही असा आरोप देवानंद लोणारे यांनी केला आहे. दरम्यान सकाळी ९ च्या सुमारास डॉ.कल्याणी निंबार्ते यांनी बाळाला तपासले असता मृत घोषित केले. तसेच दुपारी १ वाजता मृत बाळाचे शवविच्छेदन न करता मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा जीव गेला. त्यामुळे दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देवानंद लोणारे यांनी तक्रारीतून केली आहे. (प्रतिनिधी)