रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:49 PM2018-06-05T22:49:55+5:302018-06-05T22:50:34+5:30
मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील तीन दिवसांपासून रात्री पाऊस अन् दिवसा उन्ह अशा स्थितीमुळे भंडारावासीय त्रस्त झाले आहेत. रविवारच्या रात्री बरसलेल्या पावसानंतर दिवसभर उन्ह चांगलेच तापत आहे. आता उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. परिणामी, घामाच्या धारांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच ओलेचिंब होत आहेत. परंतु आज मंगळवारला पाऊस बरसला नाही.
भंडारा जिल्ह्यात २ जूनपासून वातावरणात बदल झालेला आहे. दुसरीकडे राज्याच्या पश्चिमी भागात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र या पावसासोबतच वादळी वाऱ्यानेही चांगलेच थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाची हजेरी लागली आहे. तद्वतच वादळी वाऱ्याने अनेक घरांसह काही वृक्षही उन्मळून पडले आहेत. एकंदरीत वादळी वाऱ्यामुळे कितींचे नुकसान झाले याची नेमकी माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही.
एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस रात्रीला बरसत असल्यामुळे दिवसा सूर्यदेवाचे दर्शन चांगलेच तापदायक ठरत आहे.
परिणामी वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला. परिणामी, लोकांची मोठी होरपळ होत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावार होत आहे. या अशा वातावरणामुळे संसर्गजन्य आजार बळावत आहेत. आता ताप, सर्दी, पडसे या आजाराच्या रूग्णसंख्या वाढत आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्यावर विपरित परिणाम
ऊन्ह पावसाच्या या खेळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. उकाड्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम होत असून सर्दी, पडसे, अंगदुखीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयासह खाजगी रूग्णालयातही गर्दी वाढली आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका बालकांना व वृद्धांना अधिक बसतो. अशा स्थितीत वेळीच प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे.
- डॉ.यशवंत लांजेवार,
बालरोगतज्ज्ञ भंडारा.