रात्रीची वेळ, किर्र अंधार.. अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ; उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यालगत थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 02:35 PM2022-12-01T14:35:40+5:302022-12-01T14:50:44+5:30
कन्हाळगाव ते सावरला मार्ग : अपघाताच्या चौकशीसाठी जात होते पोलीस
पवनी (भंडारा) : रात्रीची वेळ, किर्र अंधार.. अपघाताच्या चौकशीसाठी वाहनाने पोलिस अधिकारी जात होते. अचानक वाघोबा समोर आले अन्...हा थरार उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यालगत तालुक्यातील कन्हाळगाव ते सावरला मार्गावर सोमवारी रात्री पवनी पोलिसांनी अनुभवला. वाघाचे नियमित दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पवनी पोलिसांना अपघात झाल्याची माहिती सोमवारी रात्री मिळाली. पोलिस वाहनाने अधिकारी कर्मचाऱ्यांसह कन्हाळगाव ते सावरला मार्गावरून जात होते. रात्री ८:३० वाजताच्या सुमारास अचानक वाघ समोर दिसला. पोलिसांनी आपले वाहन थांबविले. वाघ काही क्षणात रस्ता पार करून जंगलात निघून गेला. त्यानंतर पोलिसांचे वाहन तेथून पुढे गेले. साक्षात वाघाचे दर्शन झाल्याने सर्वांची काही काळ घाबरगुंडी उडाली होती. मात्र, वाघ शांतपणे निघून गेल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.
पवनी तालुक्यातील कन्हाळगाव, सावरला परिसरात वाघाचा मुक्तसंचार आहे. सावरला परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत आहे. सावरलासह धानोरी, भोजापूर, खातखेडा, गुडेगाव, ढोराप, शेळी, शिंदी, कन्हाळगाव, शिरसाळा, चन्नेवाढा आदी गाव घनदाट जंगलव्याप्त असल्याने ताडोबा प्रकल्पाला जोडणाऱ्या कॉरिडॉरचे काम करते. त्यामुळे येथील जंगलात नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून येथे वाघांचा मुक्तसंचार वाढला आहे.
शेतकरी-शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
जंगलव्याप्त परिसरात असलेल्या शेतांमध्ये सध्या धान कापणी व बांधणीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघ दिसत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, उदरनिर्वाहाकरिता शेतावर जाणेही गरजेचे आहे. येथे वाघ फिरत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाला याविषयी अनेकदा सूचना देऊनही त्यांच्याकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नव्हते. काही दिवसांपूर्वीच ब्रह्मपुरी येथून पवनीकडे येत असताना सावरला गावाबाहेर भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनासमोर वाघ आला होता.