भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 23, 2024 11:24 AM2024-04-23T11:24:55+5:302024-04-23T11:25:36+5:30
Bhandara News: सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली.
- गोपाल कृष्ण मांडवकर
भंडारा - सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. यात एका ज्वेलर्सही समावेश असून सर्व ठिकाणचा चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल जवळपास पाच लाखांच्या घरात आहे.
दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान हे सर्व प्रकार घडले. जिल्हा परिषद चौकातील आनंदा किराणा स्टोअर्स, मेडिक्यूअर फार्मसी, पंचशील चौकातील मेन्स वेअर, गायत्री स्वदेशी, हेडगेवार चौकातील पंचशील किराणा स्टोअर्स, गणेश ज्वेलर्स आणि राजीव गांधी चौकातील बिकानेर स्वीट मार्ट या नऊ ठिकाणी चोरीचे प्रकार घडले. चोरट्यांनी सर्वच ठिकाणी एकाच पद्धतीने शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे दिसत आहे. काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोर येताना आणि चोरी करताना दिसत आहेत. यावरून हे सर्व कृत्य एकाच टोळीचे असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.
आठ जणांची टोळी
चोरी करणारी ही टोळी युवकांच्या असून त्यात आठ व्यक्ती असल्याचे दिसत आहेत. एका दुकानात दोन मोपेड वरून येऊन प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
गस्तीवर प्रश्नचिन्ह
हे सर्व प्रकार रात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडले. चोरी झालेली सर्व दुकाने मुख्य मार्गावर आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या गस्तीपथावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नऊ ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कशी आली नाही, असा प्रश्न आता नागरिकांनी व्यापारी विचारत आहेत.